पुणे : “ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर हे दुर्बल घटकांचे खरे कैवारी होते. त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या दुर्दशेचे निदान केले व अनेक मूलभूत सुधारणा सुचविल्या त्यासाठी प्रसंगी संघर्षही केला. डॉ. आंबेडकरांनी जीवनभर आचरणात आणलेल्या विचारांना तरूण पिढीने आत्मसात करावे.” असे मत ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी काढले. विश्वशांती केंद्र(आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड,माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण जामकर, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक प्रा.डी.पी.आपटे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसीचे प्राचार्य डॉ.बी.एम.खुचेकर, पूर्व न्यायमूर्ती आर.एम.खान, माईर्स एमआयटीचे उपकुलसचिव श्री. अभय बिरारी व एमआयटीचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले, “ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिले. त्याच बरोबर त्यांनी समाजाला ज्ञान देण्याचे महान कार्य केले आहे. स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव या मूल्यांसाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. नव्या भारताच्या उभारणीमध्ये त्यांचे येगदान फार मोठे आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष व संघटन केले. त्यांनी समग्र मानवतेची पूजा केली. भारतीय संविधान हे त्यांचे खरे स्मारक आहे.बाबासाहेब खरे देशभक्त, राष्ट्रभक्त व सच्चे भारतीय होते. ”
डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, “ अल्पसंख्यांक समाजावर त्यांचे फार मोठे उपकार आहेत. कारण अल्पसंख्यांकांना जर शिक्षण संस्था सुरू करावयाची असेल, तर त्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, अशी तरतूद त्यांनी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आजच्या तरूण पिढीने आपल्या जीवनाची वाटचाल करावी. डॉ. बाबासाहब आंबेडकर हे कोणत्या एका जाती-धर्माचे नेते नसून ते सर्वांचेच होते.”
हर्षल रामदास खैरनार या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडताना म्हटले, “ एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांचे व त्यांच्या अनुयायांचे जे कार्य आहे, त्यामुळे पददलित वर्गात जागृती झाली व त्यातून समाजपरिवर्तनाची पहाट उगवली. त्याच प्रमाणे त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे सर्व जगात भारतीय समाज एका उंचीवर गेला. ”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ भगवान गौतम बुद्ध , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सारख्या थोर महापुरूषांची चरित्रे एकदा तरी वाचली पाहिजेत .त्यातूनच आपल्या जीवनाला आकार येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार, बहुजन समाज व स्त्रियांच्या हक्कासाठी महान कार्य केले आहे. ”
या प्रसंगी प्रा. रतनलाल सोनग्रा लिखित मैत्रेय बुद्ध या पुस्तकाचे प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील व डॉ. एल. के. क्षीरसागर यांनीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले.
माईर्स एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचार्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

