अजित राव यांचे मत; एमआयटीएडीटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे उद्घाट्न
पुणे, ता. 29 : “त्रिमितीयुक्त अवकाश म्हणजे वास्तुशास्त्रज्ञाला उपलब्ध असलेली पार्श्वभूमी असते. त्यामध्ये त्याने आपले कौशल्य वापरुन एक रचना उभी करावयाची असते,” असे मत प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ श्री. अजित राव यांनी व्यक्त केले. राजबाग, लोणीकाळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठांतर्गत सुरु करण्यात आलेल्या एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ बर्जर कूपर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी माईर्स एमआयटीचे सचिव व विश्वस्त प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटीच्या कार्यकारी संचालिका ज्योती ढाकणे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजयन इम्यन्युअल, प्रा. दीपक मांडके, प्रा. स्नेहा बिस्ट आदी उपस्थित होते.
अजित राव म्हणाले, “वास्तुशास्त्राची व्याख्या अनेक प्रकारे करता येते. उदाहरणार्थ सृजनशीलता आणि अभियांत्रिकी किंवा कला आणि तंत्रज्ञान यांचा संगम, अशी करता येईल. आपल्या देशाला हजारो वर्षांची वास्तुशास्त्राची समृद्ध परंपरा आहे. अर्थात, पाश्चात्य जगानेही या क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. म्हणून भावी वास्तुशास्त्रज्ञांनी या दोहोंचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इमारत उभी करताना पंचमहाभूतांशी आपला संबंध येतो. परंतु, त्यातील आत्मिक शक्तीचा आपल्याला विसर पडता कामा नये. शिवाय, व्यावहारिक जगात वावरताना आपल्याला सौंदर्य आणि वस्तुस्थिती यांचा सुंदर मेळ घालता आला पाहिजे, तरच या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल.”
श्री. बर्जर कुपर म्हणाले, “अनेक थोर वास्तुशास्त्रज्ञांनी इमारती, एवढेच नव्हे, तर नगरे वसविली आहेत. त्यामध्ये चंदीगढचा समावेश आहे. म्हणून आपण त्यातील कौशल्य आत्मसात करुन त्यापेक्षा काकणभर सरस अशी वास्तुशिल्पे उभारली पाहिजेत. जगातील लोकांना आता त्या ठोकळेबाज इमारतींचा कंटाळा आला आहे. त्यामुळे यापुढील काळात वास्तुशिल्प उभारणार्यांना मोठा वाव आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “एकावर एक काडी पेट्या ठेवल्यासारख्या इमारती उभ्या करणे याला फार मोठी बुद्धिमता लागत नाही. त्यासाठी सौंदर्यदृष्टीही असली पाहिजे. आम्ही आमच्या संस्थेच्या इमारती बांधताना ग्रीक-रोमन आणि भारतीय परंपरांची सांगड घातली आहे. आपली प्राचीन भारतीय वास्तुशिल्पे, विशेषत: मंदिरे उभी करताना त्यांनी मोठीच सृजनशीलता दाखविली आहे. त्यांना आजच्यासारखे औपचारिक शिक्षण मिळाले नसले, तरी निसर्ग आणि समाज यांच्याकडे पाहण्याची दैवी स्वरुपाची दृष्टी होती.”
प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “सर्व जग एक लहान खेडे बनत चालले आहे. त्यामुळे विविध संस्कृतींचा परस्परांवर परिणाम होऊन एक जागतिक संस्कृती उदयाला येत आहे. अशावेळी सर्वांनी डोळसपणे त्याचे निरीक्षण करुन एक प्रगतीशील स्वरुपाची विद्या शिकली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मार्ट सिटी सारख्या कल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठीचे शिक्षण येथे दिले जाणार आहे. कला, डिझाईन आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
डॉ. विजयन इम्यन्युअल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सौ. ज्योती ढाकणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. स्नेहा बिस्ट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुधीर राणे व आदिती देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा. दीपक मांडके यांनी आभार मानले.

