एमआयटी, पुणे तर्फे ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. आरिफ महम्मद खान यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर!
पुणे: विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत तर्फे प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि थोर विचारवंत डॉ. वेद प्रताप वैदिक, तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉ.आरिफ महम्मद खान यांनी अत्यंत समर्पित व श्रद्धापूर्वक भावनेने त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल अतिशय प्रतिष्ठेचा असा “ समर्पित जीवन गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. सम्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत तर्फे श्रीरामनवमीचे औचित्य साधून रामेश्वर (रूई) ता.जि. लातूर येथील सोनवळा नदीवर बांधण्यात आलेल्या, हिंदू-मुस्लिम ऐक्य साधणार्या, विश्वशांती, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणार्या विश्वधर्मी श्री राम-रहीम मानवता सेतू च्या लोकार्पण सोहळ्याच्यावेळी हा “ समर्पित जीवन गौरव पुरस्कार” मंगळवार, दि.4 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10.15 वा. रामेश्वर (रूई) ता.जि. लातूर येथे प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारतचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी दिली.
डॉ.वेद प्रताप वैदिक हे भारतातील जग प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि थोर विचारवंत आहेत. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1944 मध्ये इंदोर येथे झाला. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय राजकारण विषयात पीएचडी मिळविली. डॉ.वैदिक यांनी 1958 पासून पत्रकारितेची सुरूवातकेली. नवभारत टाइम्स, भाषा आणि पीटीआयमध्ये सेवा केलेली आहे. ते भारतीय भाषा सम्मेलनाचे अध्यक्ष व नेटजाल डॉट कॉम चे संपादक होते. त्यांनी सुमारे 10 पुस्तकांचे लेखन केलेले आहे. पत्रकारिता आणि अन्य क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांना काबूल विद्यापीठ, उत्तर प्रदेश सरकार, उत्तर प्रदेश हिंदी साहित्य सम्मेलन यांच्या तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘श्रेष्ठ कला आचार्य पुरस्कार’ देण्यात आला आहे. कानपूर येथे ‘ डॉ. राममनोहर लोहिया सन्मान’, तसेच, पंतप्रधान यांच्या हस्ते ‘ रामधारी सिंग दिनकर शिखर सन्मान’ देण्यात आलेला आहे.
डॉ.आरिफ महम्मद खान यांचा जन्म बुलंदशहरामध्ये 1951 साली झाला. त्यांनी 1972-73 मध्ये सरचिटणीस व 1973-74 मध्ये अध्यक्ष म्हणून अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व केले. 1977-80मध्ये उत्तर प्रदेश मधील बुलंदशहर येथील सियाना मतदार संघातून आमदार पदी निवडून आले. ते एकूण चार वेळा खासदार पदावर निवडून आले असून ते केंद्रामध्ये उपमंत्री व राज्यमंत्री म्हणून त्यांनी माहिती प्रसारण, कृषी, ऊर्जा,उद्योग आणि सहकार, गृह इत्यादी खाती सांभाळली आहेत. तसेच, त्यांनी ऊर्जा आणि नागरी विमान वाहतूक खात्याचे केंद्रीय मंत्री पद सुद्धा भूषविले आहे.
डॉ.आरिफ महम्मद खान हे इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक असून कुराण आणि तत्कालीन आव्हाने यावर त्यांची पुस्तके लोकप्रिय झाली आहेत. 1986 मध्ये शहाबानू प्रकारणाचा निषेध म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातून राजीनामा दिला होता. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे विर्सजन व्हावे या विचारधारेचे ते आहेत.
डॉ. वेद प्रसाद वैदिक आणि डॉ.आरिफ महम्मद खान यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण कार्याबद्दल विश्व शांती केंद्रातर्फे ‘समर्पित जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.