पुणे : “ नाविन्यपूर्ण संशोधन, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता या मुदयांच्या आधारे कोणत्याही शिक्षणसंस्थेची आणि विद्यापीठाची नोंद ही जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये होते.त्याच अनुषंगाने क्वाकारेली सायमंड्स (क्यूएस) आपले मूल्यांकन ठरवते. ” असे प्रतिपादन सिंगापूर येथील क्वाकारेली सायमंड्स (क्यूएस) कार्यालयाचे प्रादेशिक संचालक अश्विन फर्नाडिस यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे “ विद्यापीठाची क्रमवारी, गुणवत्ता आणि कार्यपद्धती, ” यावर आयोजित राष्ट्रीय पातळीवरील एक दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उदघाटन माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांनी केले.
यावेळी सिंगापूर येथील क्वाकारेली सायमंड्स (क्यूएस) कार्यालयाचे सल्लागार पीटर स्टीक, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे उपाध्यक्ष डॉ.मंगेश तु. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.अरूण जामकर आणि लोणार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.सुभाष आवळे हे उपस्थित होते.
अश्विन फर्नाडिस म्हणाले, “विद्यापीठाची क्रमवारी, गुणवत्ता आणि कार्यपद्धती या विषयांवर विस्तृत माहिती दिली. जगातील विद्यापीठांमध्ये नोंदविल्या गेलेल्या 200 विद्यापीठात भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. जगामध्ये ज्या पद्धतीचे मूल्यांकन होते त्यात नाविन्यपूर्ण संशोधन, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन 5%, प्राध्यापक वर्ग आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची गुणवत्ता 5% या मुद्यांंवर विशेष भर दिला जातो. तसेच अध्यापन पद्धतीसाठी 40%, प्राध्यापकवर्ग 10%, सायटेशन प्रति कर्मचारी 20%, संशोधनपर प्रबंध आणि विद्यार्थ्यांचे आदान प्रदान 20%, यानुसार मूल्यांकन ठरविले जाते. या दृष्टीने प्रयत्न केल्यास जागतिक दर्जाच्या विद्यापीठामध्ये देशातील विद्यापीठांचा नक्कीच समावेश होऊ शकेल. यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असेल. ”
पीटर स्टीक म्हणाले, “ शिक्षणसंस्थेमध्ये होणारे संशोधन हे समाजाभिमुख असावे. संशोधनकर्ता जेव्हा आपले संशोधन प्रकाशित करतो, त्याचे पेटंट कंपनीला देतो, तेव्हा त्यातून पैसा कमविता येतो व संशोधन उत्पादनासाठी वापरले जाते. हे एका अर्थाने समाजाच्या भल्यासाठी असते. या स्वरुपाचे संशोधन समाजासाठी अधिक मूल्यवान असते. या व अशा मुदयांवरून विद्यापीठाची क्रमवारी, गुणवत्ता आणि कार्यपद्धती पारखली जातेे. त्या आधारे विद्यापीठाचा दर्जा ठरविण्यात मदत होते. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “ जागतिक दर्जाच्या विद्यापीठामध्ये आपल्या देशाचा विद्यापीठाचा समावेश करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. जागतीक दर्जाचे शिक्षण कसे देता येतील त्याच प्रमाणे विद्यापीठ कसे बनेल या दृष्टिने विचार होेणे गरजेचे आहे. भारत शिक्षण क्षेत्रात प्रगती करीत आहे. त्याला मूल्याधिष्ठीत व आध्यात्मिक शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे. विश्वामध्ये भारतीय शिक्षण पद्धती तयार करण्याची गरज आहे. त्याच दृष्टिने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ”
प्रा. डॉ.मंगेश कराड म्हणाले, “ प्रत्येक शिक्षणसंस्थेमध्ये क्रमवारीचे महत्व वाढले आहे. त्याच्या कसोट्या काय असतात, याच्या अनुषंगानेच कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रामधून मिळणार्या माहितीच्या आधारे आमचे विद्यापीठ देखील जागतिक स्तरावर स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल.”
या चर्चासत्रात शिक्षण क्षेत्रातील 200 तज्ज्ञ सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल अन्नदाते आणि चारूदत्त कुलकर्णी यांनी केले. प्रा.डॉ. आर. व्ही. पूजेरी यांनी आभार मानले.