पर्यावरण संवर्धनासाठी जीवनशैली बदला डॉ. राम भूज यांचे आवाहन : मिटसॉम तर्फे युवा पर्यावरण परिषद
पुणे : “पर्यावरणावर सर्वात जास्त परिणाम करणारे घटक मनुष्याची जीवनशैली आणि खाण्याच्या पद्धती आहेत. पर्यावरणाचा होणारा र्हास ही चिंताजनकक बाब आहे. त्यामुळेच मानवाने या दोन्हीं विषयाकडे गंभीरपणे पहावेे.” असे उदगार दिल्ली येथील युनेस्कोचे कार्यक्रम तज्ज्ञ डॉ.राम भूज यांनी केले.माईर्स मिटसॉम कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय युवा शाश्वस्त जीवन पद्धती 2017 समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळेस जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या रूपा दावने, तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, तेर पॉलिसी सेंटरच्या डॉ.विनिता आपटे आणि मिटसॉम कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.एम.चिटणीस हे उपस्थित होते.
डॉ.राम भूज म्हणाले, “बदलत्या काळानुसार प्रत्येकाला शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यात गुणात्मक शिक्षण तसेच जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे. शिक्षणामुळेच मानवाच्या जीवनशैलीमध्ये परिवर्तन येईल आणि त्याचा परिणाम पर्यावरण सुरक्षेसाठी होईल. पर्यावरणाचा र्हास ही चिंताजनक बाब आहे. विकासाबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन साधण्याची गरज आहे. ”
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, “मनुष्याच्या वर्तनामुळे बदलणारी पृथ्वी ही विनाशाच्या दारावर उभी आहे. बदलत्या काळानुरूप मानवाने नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवावा. तसेच सौर ऊर्जेचा पुरेपूर वापर करावा. त्यासाठी प्रत्येक जागेचा विचारपूर्वक वापर करावा. वाढते प्रदूषण लक्षात घेऊन इलेक्ट्रिक कार आणि सायकलचा वापर मोठया प्रमाणात करावा. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनामध्ये मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ज्या प्रमाणे सर्व क्षेत्रातील आलेख उंचावला जात आहे, त्याच प्रमाणे प्रदुषणाचा आलेख सुद्धा अचानक वाढू लागला आहे. त्याला नियंत्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात यावे. ”
प्राचार्य डॉ.आर.एम.चिटणीस प्रास्ताविकात म्हणाले, पर्यारवण सुरक्षेत राज्य सरकार व मनपा आपले कार्य करीत आहे, पण या मध्ये विद्यार्थ्यांची भूमिका सर्वात मोलाची आहे. वाढत्या कंपन्यांमुळे हवा, पाणी, पर्यायाने संपूर्ण पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहेे. या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून टाटा मोटर्स कंपनी कार्य करीत आहे.
रूपा दानवे व डॉ.विनीता आपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.सुदिप्ता बैनर्जी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.