मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी अतिरिक्त महासंचालक श्री. मुकेश शर्मा यांना ‘भारतीय संस्कृती दर्शन जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर
पुणे – विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत तर्फे मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी अतिरिक्त महासंचालक श्री. मुकेश शर्मा यांना प्रसारभारतीच्या माध्यमातून गेली तीन दशके आकाशवाणी व दूरदर्शनमधून त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ‘भारतीय संस्कृती दर्शन जीवन गौरव’ हा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार शनिवार, दि. 4 मार्च 2017 रोजी राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेच्या समारोप सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी येथे प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. मुकेश शर्मा यांनी 1980 साली चिल्ड्रन्स फिल्म्स सोसायटीमधून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. त्यांनी निर्मित केलेल्या ‘अनोखा अस्पताल’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे 1990 सालच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चिल्ड्रन्स फिल्म्स सोसायटी निर्मित अंकुर-मैना-कबूतर या बालचित्रपटास प्रथम क्रमांकाचा पुरस्कारदेखील प्राप्त झाला होता. श्री. मुकेश शर्मा यांना चित्रपटसृष्टीतील दिग्गज डॉ. व्ही. शांताराम, केदार शर्मा, सत्येन बोस आदि चित्रकर्मींबरोबर काम करण्याचा अनुभव देखील प्राप्त आहे.
दूरदर्शनच्या माध्यमातून अनेकविध जनजागृती विषयक कार्यक्रमांची निर्मिती केली. त्याचीच परिणती म्हणून सन 2001 साली मुंबई दूरदर्शन केंद्राला सर्वोत्कृष्ट दूरदर्शन केंद्राचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातील घराघरात दूरदर्शन लोकप्रिय करण्यासाठी श्री. मुकेश शर्मा यांनी अविश्रांत मेहनत घेतली. सह्याद्री नवरत्न पुरस्कार, हिरकणी पुरस्कार असे विविध पुरस्कार समाजातील तळागाळातील लोकांना देऊन, त्यांचे कार्य लोकांपुढे श्री. मुकेश शर्मा यांनी ठेवले.
गेली 13 वर्षे माईर्स एमआयटी, पुणेच्या सहकार्याने राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करून, महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रोबोटिक्स’ या नाविन्यपूर्ण विषयात आपले कसब दाखविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
श्री. मुकेश शर्मा यांचे संपूर्ण जीवन हे भारतीय अस्मिता जागविण्यासाठी समर्पित आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अत्यंत प्रभावी माध्यमांचा वापर त्यांनी लोकशिक्षण, मनोरंजन आणि लोकजागृतीसाठी केला.
त्यांच्या या वैविध्यपूर्ण कार्याबद्दल विश्व शांती केंद्रातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारतचे अध्यक्ष, डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी दिली.