स्वत:च्या कार्याचा प्रारंभ स्वत:च करा श्रीमती पिथाला सुनिथा यांचे प्रतिपादन
अमरावती : ‘हे विधान केवळ तुमच्याबद्द्ल नाही. ज्यांनी तुमचा तिरस्कार केला त्यांच्याबद्दल हे आहे. तुम्ही योग्य ते करीत आहात असे अनेक लोकांना वाटते म्हणून आजच हसतमुखाने पुन्हा सुरुवात करा. कारण स्त्री ही मुळात शक्तीमानच आहे. म्हणून स्वत:पासूनच कामाला सुरुवात करा’ असे उद्गार आंध्रप्रदेशच्या नागरी पुरवठामंत्री श्रीमती. पिथाला सुनिथा यांनी काढले.
आंध्रप्रदेश विधानसभा आणि माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फौंडेशन, पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आंध्रप्रदेशमधील अमरावती येथे सुरु असलेल्या तीन दिवसीय पहिल्या राष्ट्रीय महिला संसदेच्या तिसर्या दिवशी आयोजित ‘स्वत:ची ओळख विकसित करणे आणि भविष्यकाळाचा दृष्टीकोन’ या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी आंध्रप्रदेश विधानसभेचे सभापती डॉ. कोडेला शिवाप्रसाद राव, आंध्रप्रदेशमधील पैकाराव पेठा येथील आमदार अनिता, कर्नाटकच्या आमदार श्रीमती. विनिशा नेरो, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी एसओजीचे संस्थापक – अधिष्ठाता प्रा. राहुल विश्वनाथ कराड, डॉ. सलोनी सिदाना, हैद्राबाद येथील चिरेक स्कूलच्या श्रीमती. रत्ना रेड्डी, आंध्रप्रदेश येथील मार्गदर्शी चिट फंड प्रा. लि. च्या कार्यकारी संचालिका शैलजा किरण, सैफी टेक्नॉलॉजीस लि. चे अध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री. राजू वेगेन्सा आदी उपस्थित होते.
श्रीमती पिथाला सुनिथा म्हणाल्या की, ‘ समाजामध्ये पुरुषांना जो आदर आणि सन्मान दिला जातो तोच स्त्रियांना दिला गेला तर त्या समाजाचा गाडा पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने चालवू शकतील.’
आ. अनिता म्हणाल्या ,‘ िस्त्रयांना पाहिजे असणार्या जगासारखे हे जग पुरुषांकडून उभे केले जात नाही. पण सर्वप्रथम तिने स्वत:लाच सशक्तपणे उभे केले पाहिजे. समाजाकडून लादलेल्या गोष्टींचा स्त्रियांनी केवळ स्वीकार करुन चालणार नाही तर त्याला आव्हानही दिले पाहिजे. तिच्या भोवती रुढींचे व चाकोर्यांचे जे वर्तुळ उभे केले गेले आहे त्यामुळे तिने खचून जाऊ नये. उलट स्वत:मधील जी स्त्री अभिव्यक्तीसाठी संघर्ष करीत आहे, तिच्याबद्द्ल आदर बाळगला पाहिजे.’
विनिशा नीरो म्हणाल्या, ‘जीवनाला नियतीचा स्वत:चाच रस्ता असतो. पण आपण त्याला त्याच्याप्रमाणे झेप घेऊ दिली पाहिजे. मी प्रथम बिल गेट्स यांच्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. पण आता मी कोणत्याही प्रकारची ‘खिडकी’ किंवा दारे न ठेवता लोकांसाठी काम करते. मी तुम्हाला यशाचा मंत्र सांगते. तुम्ही स्वत:च्या कामाबद्द्ल बोलू नका. तुमच्या कामालाच तुमच्या बद्दल बोलू द्या. खरे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा स्रीवादी बनवा.’
शैलजा किरण म्हणाल्या ‘ मुलगी, पत्नी किंवा आई म्हणून न जगता सर्वप्रथम एक माणूस म्हणून जगण्याची आता वेळ आली आहे. प्रथम विचार करा, की तुम्ही नक्की कोण आहात आणि तुम्हाला काय म्हणून जगावयाचे आहे.’
सलोनी साधना म्हणाल्या, ‘मोठी स्वप्ने पाहा. कोणतीही क्षुल्लक गोष्ट तुमच्यासाठी नाही. स्वप्ने अशी बघा, की ज्याने तुमची झोप उडावयास हवी. तुमच्या स्वप्नपूर्तीच्या वाटेमध्ये अनेक अडथळे येतील. पण तुम्ही त्यांचाशी समर्थपणे दोन हात करा आणि स्वत:ची ओळख निर्माण करा. घटनेने आपल्याला समान अधिकार दिले आहेत. पण समाजातील लिंगभेदामुळे स्त्रियांच्या सक्षमीकरणातसुद्धा अनेक अडथळे येतात.’
पिथाला सुजाथा म्हणाल्या, ‘महिलांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात अडचणी येतात. पण जेव्हा तिला संधी मिळते, तेव्हा ती इतिहास घडविते. शिक्षणाचे प्रमाण जरी वाढले, तरी सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांचे प्रतिनिधित्व पुरेसे नाही.’
किमिडी मृणाालिनी यांनी स्त्रियांना स्वत:चे सामर्थ्य ओळखण्याचे आवाहन केले.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड राष्ट्रीय महिला संसदेबद्द्ल म्हणाले की, जगातील अनेक कर्तबगार स्त्रियांनी येथे येऊन आपले अनुभव व निरीक्षण प्रकट केले. हा संदेश सर्व विद्यार्थ्यांपर्यंत जाईल.
नीलिमा शर्मा आणि प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.