महिला आरक्षण मसुदा जगासमोरील उदाहरण ठरेल
अमरावती : ‘ महिला आरक्षण विधेयक पारित करुन भारत जगासमोर एक आदर्श उदाहरण ठेऊ शकेल. मी स्वत: त्याचा पुरस्कर्ता आहे.’ असे उद्गार आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, आध्यात्मिक गुरु पद्म विभूषण श्री श्री रविशंकर यांनी काढले. आंध्रप्रदेशमधील अमरावती येथे सुरु असलेल्या तीन दिवसीय पहिल्या राष्ट्रीय महिला संसदेच्या पाचव्या सत्रात ‘राजकारणामध्ये स्त्रियांचा प्रवेश : जागतिक पातळीवर परिवर्तन ’ या विषयावर व्हिडिओ संदेशाद्वारा ते बोलत होते.
आंध्रप्रदेश विधानसभा आणि माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फौंडेशन, पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने या संसदेचे आयोजन केले आहे.
यावेळी आंध्रप्रदेश विधानसभेचे सभापती डॉ. कोडेला शिवाप्रसाद राव, युनेस्को अध्यासन प्रमुख, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह पुणेचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सिनेअभिनेत्री व माजी आमदार श्रीमती जयसुधा कपूर, एचसीएल टेक्नॉलॉजीच्या सह उपाध्यक्षा स्मृती शिवा शंकर, केनियाच्या उपसभापती जॉयसी लोबोसो, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी एसओजीचे संस्थापक – अधिष्ठाता प्रा. राहुल विश्वनाथ कराड, खासदार श्रीमती कोटापल्ली गीता, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील व खासदार श्रीमती मीनाक्षी लेखी आदी उपस्थित होते.
श्री श्री रविशंकर म्हणाले की,‘ स्त्री ही कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा दुवा आहे. कुटुंबामधील वेगवेगळ्या गोष्टींचे अचूक व्यवस्थापन करण्याचे कौशल्य तिच्यामध्ये असते. त्या कुशल प्रशासक आहेत. राजकारण असो की प्रशासन स्त्रिया नेहमीच तेथे आपला प्रभाव पाडतात. महिला आरक्षण विधेयकाद्वारे भारत जगापुढे एक चांगले उदाहरण ठेऊ शकेल. अनेक देशात सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांना आरक्षण नाही. एकूण लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या स्त्रियांना दुर्बल ठेऊन आपण देश चालवू शकत नाही. ’
जॉयसी लोबोसो म्हणाल्या,‘ शिक्षण आणि आरोग्य यापासून स्त्रिया वंचित आहेत. राजकीय आणि आर्थिक चौकटीमध्ये त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही. स्त्रियांना वगळल्यामुळे समाजाचे नुकसानच होते. त्यांना कमी वेतन मिळते. त्यात समतोल पाहिजे. जगात संसदेमध्ये फक्त 22% स्त्रिया आहेत. हे बदलणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महिला संसदे सारखे उपक्रम जगभर राबविले पाहिजेत. ’
प्रा. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,‘ या देशात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव अशी संस्कृती आहे. आम्ही आमची आई आणि बहीण या दोघींचाही आदर करतो. आपला देश जगाच्या ज्ञानाचे दालन बनेल असा संदेश कृष्णा गोदावरीच्या संगमावरून दिला जात आहे. महिला या जगासाठी शांतीदूत बनतील असे भारतातील महिला वर्गावरून वाटते. शांती आणि आंतरिक सत्य शोधण्याचा प्रयत्न या देशाने जगात सर्वप्रथम केला. ’
जयसुधा कपूर म्हणाल्या ‘ राजकारणी लोक स्वत:च्या फायद्यासाठी स्त्रियांची चुकीची प्रतिमा उभी करतात. स्त्रियांचा आवाज लोकसभेमध्ये उमटला पाहिजे. त्यांना नेहमीच दुय्यम भूमिकेत ठेवले जाते. त्या निवडून आल्या तरी त्यांचे पती किंवा वडील, इ. सूत्रे हालवीत असतात. स्त्रियांची पारंपारिक प्रतिमा बदलली पाहिजे. ’
कोट्टापल्ली गीता म्हणाल्या, ‘स्त्रिया म्हणजे ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. ज्या गोष्टी पुरुष करु शकतात, त्या सर्व गोष्टी स्त्रिया करु शकतात. पण ज्या गोष्टी स्त्रिया करु शकत नाहीत, त्या कोणीच करु शकत नाही. स्वत:चे सामर्थ्य, दुर्बलता, संधी आणि भय इत्यादी गोष्टींचे योग्य विश्लेषण करुन त्यांनी रचनात्मक कार्य केले पाहिजे. अधिकारपदावरील स्त्रियांनी इतर स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे.’
राजस्थानच्या आमदार श्रीमती जटव आणि व्ही. अनुराधा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले की, ‘ राष्ट्रीय महिला संसदेसाठी संपूर्ण देशातून आलेल्या महिला प्रतिनिधींच्या सहभागामुळे स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सबलीकरणास चालना मिळेल.’
.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.