राष्ट्रीय महिला संसदेच्या दुसर्या सत्रात व्यक्त केल्या भावना
अमरावती : ‘ स्त्री सबलीकरणाचा खरा अर्थ महिलांना आपल्या आयुष्याची दिशा ठरविण्याचा आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असणे हा होय. स्त्रियाच खर्या अर्थाने देशाच्या शिल्पकार व निर्मात्या आहेत. ती लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, दुर्गा आहे, यातच तिचे सगळे मोठेपण सामावले आहे. याचाच विचार आज सर्व समाजाने व पर्यायाने पुरुषांनी करणे गरजेचे आहे.’ अशा भावना आंध्रप्रदेशचे गव्हर्नर श्री. लक्ष्मी नरसिंहन यांनी व्यक्त केल्या.
आंध्रप्रदेश विधानसभा आणि माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणार्या तीन दिवसीय पहिल्या राष्ट्रीय महिला संसदेच्या दुसर्या दिवशी आयोजित सत्रात ते बोलत होते.
यावेळी आंध्रप्रदेश विधानसभेचे सभापती डॉ. कोडेला शिवाप्रसाद राव, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. नारा चंद्राबाबु नायडू, दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी एसओजीचे संस्थापक व अधिष्ठाता प्रा. राहुल विश्वनाथ कराड, टाइम्स ऑफ इंडियाच्या कन्स्लटिंग एडिटर सागरिका घोष, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री श्री. वाय. एस. चौधरी, यूपीएससीच्या माजी अध्यक्षा अलका सिरोही, हेरिटेज फूडसच्या कार्यकारी संचालिका नारा ब्राह्मणी, त्रिपुराच्या मंत्री बिजिता नाथ, त्रिपुराचे सभापती केदारनाथ, तेलंगणाचे सभापती मधुसूदनाचार्य, डी. सत्यप्रभा, गंगोत्री कुजर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
श्री. लक्ष्मी नरसिंहन म्हणाले की, ‘जेथे स्त्रीचे वास्तव्य असते, तिला मान-सन्मान मिळतो, तिचा आदर केला जातो, त्या ठिकाणी देवतांचे वास्तव्य असते, हे अगदी खरे आहे. आज स्त्री व पुरुष दोघांनीही एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. स्त्री म्हणून त्यांच्यात हे कमी आणि पुरुष म्हणून आमच्यात हे जास्ती, यावर चर्चा व विचार करण्याएवेजी दोघांमध्ये जे निसर्गाने दिले आहे ते स्वीकारुन एकमेकांचा आदर केला पाहिजे. खरे तर एखादी मुलगी, महिला किंवा स्त्री तेव्हाच पुढे जाऊ शकते, जेव्हा तिच्या घरचे लोक तिला भक्कम पाठिंबा देतात. आज खरे तर मुलगी जन्माला आल्यानंतर आनंदोत्सव करणे गरजेचे आहे. कारण ती सगळी नाती फार जबाबदारीने, प्रेमाने सांभाळते आणि आपली कर्तव्ये जाणून सगळ्याच नात्यांना जपत त्यांना न्याय देत असते. आज प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलींना मुलांपेक्षा जास्त शिकविणे गरजेचे आहे. कारण एक मुलगा शिकला तर त्याचे ज्ञान फक्त स्वत:पुरतेच राहते पण जर एक मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकते आणि सुसंस्कृत विचारांनी समृद्ध बनते. मुलींना त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचावयास मदत करणे हे पालकांचे कर्तव्य आहे.’
‘सोबतच शासकीय स्तरावर देखिल महिलांवरील अन्याय अत्याचारांसाठीच्या प्रकरणांमध्ये वेळेचे बंधन घातले जावे, जेणे करुन वर्षानुवर्षे केसेस न रखडता अन्यायग्रस्त महिलांना वेळेत न्याय मिळेल. आज कित्येकदा महिलांवरील अन्याय-अत्याचार प्रसंगी लोक बघ्यांची भूमिका घेतात. त्याचे फोटो काढतात. खरे तर असे करणारे लोक देखील सहआरोपी ठरतात. महिलांचा आदर केला, त्यांच्या भावना जपल्या, तर खरेच हे जग खूप सुंदर बनेल.’
न्यायाधीश जी. रोहीणी म्हणाल्या ‘ भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीस समान अधिकार दिले आहेत. आजही महिलांवर होणारे अन्याय-अत्याचार मग ते कौटुंबिक असोत की कार्यालयीन, ती खाजगी बाब समजली जाते. आज ही विचारधारा बदलण्याची गरज आहे. स्त्री-पुरुष समानतेमध्ये आजही अनेक अडथळे आहेत, हे मान्य करावेच लागेल. त्यामुळे महिला सबलीकरणाचा विचार आज प्रामुख्याने करणे गरजेचे आहे. महिला सबलीकरणाचा अर्थ शिक्षण घेणे, पैसा मिळविणे आणि अधिकार प्राप्त करणे एवढाच मर्यादित नाही. तर जेव्हा महिला मुलभूत मानवी प्रतिष्ठेने जगेल, तिच्या कल्पना, विचार, मूल्यें व तिची मते, यांचा विचार आणि आदर केला जाईल, तेव्हाच खर्या अर्थाने स्त्रियांचे सबलीकरण होईल. आजही आपल्याकडे शाळेत किंवा घरातही मुलांना स्त्री-पुरुष समता शिकविली जात नाही. जर त्यांना ही शिकवण दिली गेली तर नक्कीच ते महिलांचे हक्क आणि अधिकारांचा स्वीकार करतील. सोबतच मुलींमध्ये देखील आत्मविश्वास, स्वाभिमान आणि धैर्य येईल, ज्यामुळे त्या खर्या अर्थाने सशक्त होतील. ’
‘सोबतच त्यांनी महिलांना देखील सल्ला दिला की, महिलांनी देखील आपले कुटुंब, मुले व आपल्या जबाबदार्यांना कधीही आपल्या करिअरमधील अडथळे समजू नये. कारण एक चांगली महिलाच चांगली आई बनू शकते आणि एक चांगली पिढीही घडवू शकते. हे निश्चितच एक चांगला देश घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल.’
स्त्रियांच्या सबलीकरणाला पाठिंबा देताना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, ‘ जेव्हा आपले कुटुंब आपल्या सोबत असते तेव्हाच आपली प्रगती होते. आज स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण वाढले असूनही मोठ्या पदांवर तसेच स्तरावर मात्र महिलांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे तुम्हाला मिळणार्या संधीचे सोने करा. आज खर्या अर्थाने महिलांच्या सबलीकरणाची गरज असून त्यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण असणे आवश्यक आहे.’
प्रा. राहुल कराड यांनी राष्ट्रीय महिला संसदे बाबत आपला दृष्टीकोन व्यक्त केला. ते म्हणाले, महिला संसदेला हजर राहण्यासाठी संपूर्ण जगातून महिला आल्या आहेत आणि त्या आपले अनुभव आणि निरीक्षण व्यक्त करीत आहेत. यामधील ठराव शेकडो महाविद्याल यांना पाठविला जाईल. ’
सगरिका घोष म्हणाल्या, ‘ स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांना समर्थ बनविणे नव्हे. त्या आधीच समर्थ आहेत. जगाने त्यांच्या सामर्थ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. एक स्त्री वादी म्हणजे स्त्रिया आणि पुरुष या दोन्हीं मधील गुणवत्ता आणि मानवता यांचा आदर करते. ’
अलका सिरोही म्हणाल्या, स्त्रिमध्ये काही कमी आहे असे मूळीच समजू नका. माझ्यामधील स्त्रीवाद जेव्हा नाहीसा केला जात नाही तेव्हा मी स्वत:ला निश्चितपणे सशक्त मानते. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी शिक्षण महत्वपूर्ण भूमिका बजावते. होय, स्त्रिया सुद्धा हे करु शकतील, असे आई – वडील त्यांच्या मुलींबाबत मानतील अशी मला आशा आहे.
वाय. एस. चौधरी म्हणाले, आजपर्यंत मी एकाही दुर्बल स्त्रीला भेटलेलो नाही. पण कधी-कधी त्या आपले सामर्थ्य प्रकट करीत नाहीत. ही एक शोकांतिका आहे. आणि अचानक त्यांना शक्ती येते. माझे मत असे आहे स्त्रियांचे सामर्थ्य शोकांतिकेपूर्वी प्रकट झाले पाहिजे. एकीकडे आपल्या मुलाला प्राधान्य देणे आणि दुसरीकडे स्त्री सबलीकरणाबद्द्ल बोलणे हा विरोधाभास नाहीसा झाला पाहिजे.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.