अमरावती : ‘अतिशय कमी वयात माझ्यावर अॅसिड हल्ला झाला. कारण मी ‘नाही’ म्हणाले. त्याने माझ्यावर हल्ला केला, कारण त्याने ठेवलेला लग्नाचा प्रस्ताव मी नाकारला.’ असे असे उद्गार अॅसिड हल्ला विरोधी मोहिमेच्या प्रमुख श्रीमती लक्ष्मी म्हणाल्या. स्त्रियांच्या सबलीकरणासमोरील सामाजिक-राजकीय आव्हाने या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय महिला संसदेच्या 1ल्या सत्रात त्या बोलत होत्या.
आंध्रप्रदेश विधानसभा आणि माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांच्या पहिल्या राष्ट्रीय महिला संसदेचे दि. 10, 11 व 12 फेब्रुवारी 2017 दरम्यान रिव्हर फ्रंट, अमरावती, आंध्रप्रदेश येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी त्या श्रोत्यांना संबोधित करीत होत्या.
यावेळी एएनआयच्या संपादिका श्रीमती स्मिता प्रकाश, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. महंम्मद युनूस, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. पशुपती अशोक गजपती राजू, आंध्रप्रदेश विधानसभेचे सभापती डॉ. कोडेला शिवाप्रसाद राव, भारतीय अमेरिकन नेत्या अरूणाल मिल्लर, राष्ट्रीय महिला संसदेचे समन्वयक व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे अधिष्ठाता प्रा. राहुल विश्वनाथ कराड, खा. के. कविथा, सामाजिक संशोधन केंद्राच्या संचालिका श्रीमती रंजना कुमारी, श्रीमती अनराधा प्रभूदेसाई व बिल अॅण्ड मेलिंडा गेटस् फाऊंडेशनच्या उपसंचालिक कॅथरिन हे व इतर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थिनींच्या विशाल संमेलनात भाषण करताना श्रीमती लक्ष्मी म्हणाल्या की, “बलात्कार किंवा स्त्रियांचा विनयभंग किंवा घरेलू हिंसाचार या गोष्टींची भारतात खूप मोठ्याप्रमाणात चर्चा होते. परंतू अॅसिड हल्ल्याकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. अनेक वर्षांच्या मोहिमेनंतर अॅसिड हल्ल्याकडे गंभिरपणे पाहिले जाऊ लागले आहे. हल्लेखोर सापडल्यानंतर त्याला शिक्षा होईल पण त्या पीडित तरूणीचे काय? तिच्यासाठी आम्ही काय करतो. अॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या तरूणीचे पुनर्वसन झाले पाहिजे. आज मी त्या हल्लेखोराला घाबरत नाही. उलट तोच मला घाबरतो.”
या संसदेत सहभागी झालेल्या हजारो महिलांना संबोधित करताना पशुपती अशोक गजपती राजू म्हणाले, “तुम्हाला जर तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त सामर्थ्याची जाणीव असेल, तर तुम्ही ते प्रकट करू शकाल. महिला पूर्णपणे सक्षम होतील, त्या दिवसाची मी वाट पाहतो आहे. आमच्या बालपणी आमची आजी म्हणजे खंबीरपणाचा मोठा स्त्रोत होती. कुटुंबामध्ये मूल्ये रूजविण्याचे मोठे कार्य ती करीत असे. पण आज आजीच नाहीशी होत चालली आहे. समाजातील दूष्ट प्रवृत्तींवर मात करणे आणि स्त्रियांना सक्षम करणे हे राष्ट्रीय महिला संसदेने भारताला दाखविले आहे.”
अरुणा मिल्लर म्हणाल्या, “ मी जेव्हा राजकारणात पाऊल ठेवले, तेव्हा लोकांनी मला विचारले की, तुमच्यासारखी चांगली स्त्री राजकारणात काय करणार. आज मी व्यावसायिक राजकारणी आहे. आणि माझ्या टीकाकारांना मी चुकीचे ठरविले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदी अतिशय उच्चशिक्षित अशा महिलेला निवडून आणण्याची खूप मोठी संधी आम्हाला मिळाली होती. परंतू त्या संधीचा आम्हाला उपयो करून घेता आला नाही.”
डॉ. महम्मद युनूस म्हणाले, “आम्ही गरीब स्त्रियांना छोटी कर्जे देतो. मुख्य धारेतील बँकिंग क्षेत्र फक्त श्रीमंतांना मदत करते. आम्ही गरीब स्त्रियांसाठी ग्रामीण बँक निर्माण केली. ही बँक म्हणजे स्त्रियांसाठी स्त्रियांची बँक आहे. मुख्य धारेच्या बँका श्रीमंतांकडे जातात, आम्ही गरीब स्त्रियांकडे जातो, ते पुरुषांकडे जातात आम्ही स्त्रियांकडे जातो. जेेथे जेथे समस्या असतील तेथे आम्ही व्यवसाय निर्माण करतो. अर्थात नफा मिळविण्यासाठी नाही, तर जनतेेेचे प्रश्न सोडविण्यासाठी. आमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हाला शासनाची गरज पडत नाही.”
तरूण खासदार श्रीमती के. कविता म्हणाल्या, “भारतीय म्हणून आणि महिला म्हणून आम्ही कोठे आहोत, हे समजून घेतले पाहिजे. आज असे काही देश आहेत, की जेथे महिलांना ड्रायव्हिंग करण्यावर बंदी आहे. याउलट अमेरिकेसारखे खूप उदारमतवादी देशही आहेत. आजपर्यंत एकही महिला अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. भारतात मात्र ती केव्हाच होऊन गेली आहे. जगात अशी समस्या आहे की, सर्वात बुध्दिमान लोक हे जनतेचे मनोगत व्यक्त करीत नाहीत. मी सर्व विद्यार्थिनींना असे आवाहन करते की, तुम्ही तुमच्या मनातले विचार प्रकट करा. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारा. तुमच्या पालकांना प्रश्न विचारा, शिक्षकांना प्रश्न विचारा, समाजाला प्रश्न विचारा, किंबहुना प्रत्येकालाच प्रश्न विचारा.”
श्रीमती स्मिता प्रकाश म्हणाल्या, “मी जेव्हा पत्रकारितेमध्ये प्रवेश केला तेव्हा मला असे आढळून आले की, पुरुषांनाच उत्तम बातम्या मिळतात, सहजपणे माहिती मिळते. पण महिलांना मात्र तेथपर्यंत प्रवेश मिळत नाही. 20 वर्षांनंतरसुध्दा आजही परिस्थिती जवळजवळ तशीच आहे. स्वतःचे ध्येय निश्चित करणे ही खरे महिला सबलिकरण आहे. तिने तिचे नशिब घडविले पाहिजे. महिला सबलीकरणाची प्रक्रिया अतिशय संथ आहे. ती बळकट केली पाहिजे.”
रंजना कुमारी म्हणाल्या, “आपली सर्वांची एकी हीच आपली शक्ती ठरू शकेल.स्त्रियांनी इतक्या झपाट्याने वाट चालली पाहिजे, की भारताच्या लोकसभेमध्ये त्यांना 50 टक्के जागा मिळतील. ज्या दिवशी स्त्रिया आपली सुप्तशक्ती ओळखतील तेव्हा, त्यांची छेडछाड, त्यांच्यावरील अन्याय व अत्याचार आपोआप थांबतील. या देशात स्त्रियांचे नेतृत्व मनापासून मानले गेले पाहिजे. स्त्रियांच्या नेतृत्वामुळे हिंसाचार थांबेल आणि हे जग शांततापूर्ण बनेल. ”
आपल्या व्हिडिओ संदेशात श्रीमती मेलिंडा गेटस् म्हणाल्या, “स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय महिला संसद हे चांगले व्यासपीठ ठरू शकेल. ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी संपूर्ण भारतातून महिला प्रतिनिधी आल्या आहेत. जेव्हा महिला आणि विद्यार्थिनी प्रगती करतील, तेव्हा सर्व समाजच पुढे जाईल. ”
भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर आपल्या व्हिडिओ संदेशात म्हणाल्या “संपूर्ण जगामध्ये या संसदेचा सकारात्मक ध्वनी ऐकला जाईल. या संसदेच्या यशाला माझ्या शुभेच्छा आहेत. श्री.चंद्राबाबू नायडू व प्रा.राहुल विश्वनाथ कराड यांनी केलेल्या आयोजनाबद्दल मी त्यांचे आभार मानते. ”
नीलिमा शर्मा व प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.