एमआयटी देणार 120 भूकंपरोधक घरे ….
पुणे- सन 2015 च्या नेपाळ येथील अत्यंत विध्वंसक भूकंपामध्ये उध्वस्त झालेल्या गोरगरीबांसाठी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत या शैक्षणिक संस्थेतर्फे बांधण्यात आलेल्या 120 भूकंपरोधक घरांचा लोकार्पण सोहळा काठमांडू येथे शनिवार, दि. 21 मे 2016, भगवान गौतम बुद्ध जयंती रोजी संपन्न होणार आहे .
दि. 25 एप्रिल 2015 रोजी, आपले शेजारी राष्ट्र नेपाळ येथे जो महाप्रलयंकारी व अत्यंत विध्वंसक स्वरूपाचा भूकंप झाला होता व ज्यामध्ये गोरगरीबांची हजारो घरे उध्वस्त झाली होती तसेच अनेक कुटुंबाचे संसार उध्वस्त होऊन, खूप मोठी जीवित व वित्त हानी झाली होती, त्या जागी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत या शैक्षणिक संस्थेतर्फे, विद्यार्थी, विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेल्या निधीतून, अत्यंत परिश्रमपूर्वक व कष्टाने सुमारे 120 भूकंपरोधक, मजबूत व टिकाऊ घरांची निर्मिती करण्यात आली आहे.
नेपाळमधील काठमांडू येथे तारकेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत, तारकेश्वर नगरपालिका व नेपाळ सरकारच्या सहमतीने व परवानगीने
१. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांतीनगर (45 घरे)
२. तत्त्वज्ञ संत श्री तुकाराम विश्वशांतीनगर (42 घरे)
३. भगवान गौतम बुद्ध विश्वशांतीनगर (33 घरे)
अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 120 भूकंपरोधक घरांची उभारणी विश्वशांती केंद्रातर्फे करण्यात आली आहे.
गौतम बुद्ध जयंतीचे औचित्य साधून शनिवार, दि. 21 मे 2016 रोजी सकाळी 9.15 वाजता काठमांडू, तारकेश्वर येथे या 120 घरांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
या ऐतिहासिक स्वरूपाच्या लोकार्पण सोहल्यासाठी विशेष सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून मानव एकता मिशनचे संस्थापक-अध्यक्ष महायोगी श्री एम व अयोध्या येथील रामजन्मभूमी शिलान्यासाचे कार्रकारी अध्यक्ष व माजी खासदार डॉ. रामविलास वेदांती उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर, नेपाळचे माननीय पंतप्रधान, उपपंतप्रधान, राष्ट्रपती व इतर मान्यावरांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे.
या समाजहिताच्या उपक्रमांतर्गत, गोरगरीबांसाठी उभारण्यात आलेले प्रत्येक घर सुमारे 200 चौ.फुटाचे असून शौचालय, बाथरुम, पाण्याचे नळ अशा आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पुढची किमान 30 ते 40 वर्षे नैसर्गिक आपत्तींना सहजपणे तोंड देतील, अशा स्वरूपाची छोटीशी, तरीही देखणी व टिकाऊ भूकंपरोधक घरे निर्माण करन्यात आलेली आहेत. त्याचबरोबर, तारकेश्वर रेथे असलेल्या प्राचीन तारकेश्वर मंदिर व परिसराचे सुशोभिकरणदेखील संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि गौतम बुद्ध यांच्या नावाने निर्माण करन्यात आलेल्या तीन(3) विश्वशांती नगरांच्या या ऐतिहासिक स्वरूपाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. सुचित्रा नागरे, डॉ. संजय उपाध्ये, सौ. स्वाती चाटे, इतर मान्यवर व संस्थेचे काही पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, अध्यक्ष, विश्वशांती केंद्र, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. एस. एन. पठाण आणि डॉ. सुचित्रा नागरे यांनी पत्रकारांना दिली.