९ व्या जागतिक ज्ञान-विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषदेचा दुसरा दिवस
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना विश्व शांति विद्यारत्न पुरस्काराने सन्मान
पुणे,१० फेब्रुवारीः विद्या आणि विनयशीलता ही भारताची ओळख आहे. अनेक भाषा, धर्म, जाती, पंथ येथे गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. संस्कृती आणि सभ्यता आणि अनेकतेतून एकता यामुळे भारत देश सर्वश्रेष्ठ आहे. असे उद्गार केरळचे राज्यपाल मा. डॉ. आरिफ मोहम्मद खान यांनी काढले.माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, तर्फे त्र्यंबकेश्वर सभागृह, काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर येथे तीन दिवसीय ९व्या जागतिक ज्ञान-विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पद्मभूषण आचार्य वशिष्ठ त्रिपाठी, वाराणसी चे श्री काशी विद्वत परिषदचे सचिव डॉ. शुक्रदेव त्रिपाठी, डॉ. योगेंद्र मिश्रा, माईर्स एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटी ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सचिव प्रा.स्वाती कराड चाटे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
याप्रसंगी श्री काशी विद्वत परिषदेतर्फे विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना विश्वशांती विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. आरिफ मोहोम्मद खान म्हणाले, प्रत्येक माणसात एक अलौकिक शक्ती आहे. त्यामुळे रंग, रूप, भाषा यांच्याशी काहीच संबंध नसते. प्रत्येकात ब्रम्ह आहे हे माहित असूनही प्रत्येकजण अज्ञानाखाली दडलेला आहे. हे अज्ञान जर दूर केले तर खर्या अर्थाने भारतीय परंपरा समजून घेता येईल. प्राचिन भारतात नाविन्य दडलेले आहे. हजारो वर्षांपासून येथे प्रज्ञा पाठ शिकवला जात आहे. इंद्रियांना नियंत्रित करून आत्मज्ञान मिळविता येते. त्यासाठी अज्ञानाचा पडदा दूर केला पाहिजे.पद्मभूषण आचार्य वशिष्ठ त्रिपाठी म्हणाले, काशी या शब्दाचा अर्थच विद्वान हा आहे. येथे आल्यावर सर्वांचेच भाग्य उजळते. ज्या मनुष्याची जशी भावना तसाच त्याचा धर्म असतो. धर्मग्रंथांनी जे चिन्हांकित केलेले असते तोच वास्तवात खरा धर्म. त्याच धर्माच्या आधारावर आपल्याला सिध्दी प्राप्त होते.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, काशी विश्वनाथ कॉरिडॉर ज्ञानाचे दालन म्हणून उदयास आले पाहिजे. सर्व जगात शांती प्रस्थापित करण्याचे काम येथून होत आहे. धर्माच्या नावाखाली दहशतवाद पसरला आहे. त्याला आळा घालणे आवश्यक आहे. भारत हा असा एकमात्र देश आहे तो जगात सुख, शांती, समाधानाचा मार्ग दाखवू शकतो.
डॉ. शुक्रदेव त्रिपाठी म्हणाले, प्रत्येक राष्ट्राचे एक चरित्र असते. तसे पाहिले तर अध्यात्म हे भारताचे चरित्र आहे. अध्यात्म जर भारतापासून दूर झाले, तर येथे काहीच उरणार नाही. येथील सर्व धर्मांचे विचार, प्रार्थना मानवाच्या कल्याणासाठी आहेत. म्हणूनच भारत लवकरच विश्वगुरू बनेल.
डॉ. योगेंद्र मिश्रा व डॉ. मिलिंद पांडे यांनी आपले विचार मांडले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा.स्वाती कराड चाटे यांनी आभार मानले.

