तरूणांनी राष्ट्रीय भावना अंगी बाणवावी…! एअर मार्शल भूषण गोखले
पुणे : “आजकाल तरूण वर्ग हा आत्मकें द्रित होत चालला आहे. त्याला सामाजिक बांधिलकीची जाणीव नाही. खरे म्हणजे त्यांच्यामध्ये राष्ट्रीय भावना रूजविणे महत्त्वाचे आहे.” असे उद्गार माजी चीफ ऑफ एअर स्टाफ, एअर मार्शल भूषण गोखले यांनी काढले. माईर्स महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या (गंधर्व-17) पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक संचालक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, माईर्स एमआयटीचे सह संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, प्राचार्य डॉ. ललितकुमार क्षीरसागर व प्रा. डॉ. एम. वाय गोखले हे उपस्थित होते.
तसेच, यावेळी जनरल सेक्रेटरी रमा पांडकर, जॉईंट जनरल सेक्रेटरी संकेत सदावर्ते, कल्चरल व ड्रामा सेक्रेटरी दिपाली अंदे, जॉईंट कल्चरल व ड्रामा सेक्रेटरी हरेश भानूशाली हे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले,“जेव्हा आणीबाणीचा प्रसंग येतो, तेव्हा संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा असतो. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. अगदी गरीबातल्या गरीब लोकांनीसुध्दा संरक्षण निधीला हातभार लावला आहे. अर्थात आणीबाणीचा प्रसंग येण्याची वाट न पाहता आपण सदैव सज्ज असले पाहिजे. जवान आणि सर्वसामान्य लोक यांची ही जबाबदारी आहे.’’
“दुर्दैवाने आजकाल सैन्यदलात भरती होणार्या तरूणांची संख्या कमी होत चालली आहे. केवळ सुरक्षित जीवन व पैसा याच गोष्टींचा विचार करून तरूणवर्ग, विशेष करून उच्चशिक्षित वर्ग सैन्यदलापासून दूर रहात आहे. ही गोष्ट देशाच्या हिताची नाही. एवढेच नव्हे तर, त्या तरूणांनाही फारशी भूषणावह नाही. महाराष्ट्र राज्य तर एकेकाळी या बाबतीत आघाडीवर होते. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. ती सुधारली पाहिजे. सैन्यदलामध्ये त्यांनी प्रवेश केल्यास निश्चितच त्यांचे सामर्थ्य वाढेल. यासाठी तंत्रवैज्ञानिक पदवीधरांनी सैन्यदलात प्रवेश केल्यास या प्रक्रियेला गती मिळेल. तंत्रज्ञान हे सतत विकसित होणारे क्षेत्र आहे. त्याचा उपयोग करून जनतेच्या प्रश्न सोडविले पाहिजेत. ’’
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“चारित्र्य आणि शिस्त हे तुम्हा विद्यार्थ्यांचे खरे अलंकार आहेत. ते अंगी बाणवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. असे काहीतरी कार्य करावे, की तुमच्या आई-वडिलांना अभिमान वाटला पाहिजे. लाज तर वाटता कामाच नये. आजची तरूण पिढी पाश्चात्यसंस्कृतीमुळे बिघडत चालली आहे. त्यांना आपल्या संस्कृतीचा विसर पडला आहे. आजच्या तरूणांनी भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञान यांचा अंगीकार केल्यास कुटुंबाची, समाजाची व देशाची प्रगती होईल.’’
एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रा.डॉ. ललितकुमार क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले.
सिध्दिका पाटील व यश गिल्डा यांनी सूत्रसंचालन केले.
जिमखाना सेक्रेटरी विपुल टी याने आभार मानले.