पुणे: “देशात अशी आर्थिक स्थिती निर्माण करावी की जेणे करून येथील कोणतीही महिला पुरूषासमोर पैशासाठी हात पसरविणार नाही. महिला या ऊर्जेचा स्त्रोत असल्याने त्यांना कमजोर समजू नका. महिलांनी कुटुंबाची काळजी घेत सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवावा” असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे चार दिवसीय ऑनलाईन दुसर्या राष्ट्रीय महिला संसदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. ही संसद १४ जानेवारी पर्यंत चालणार आहे.
या प्रसंगी राज्यस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देवाश्री चौधरी, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशच्या राज्यापाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय आदिवासी कामकाज राज्यमंत्री रेणुका सिंग, सुप्रसिद्ध नृत्यंगणा पद्मभूषण डॉ. मल्लिका साराभाई, द कॉमन वेल्थच्या महासचिव पार्टीशिया स्कॉटलँड, पार्श्वगायक पद्मश्री कैलास खेर आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती रितू छाब्रिया या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून दुसरी राष्ट्रीय महिला संसद भरवली जात आहे.
या वेळी माईर्स एमआयटीच्या सहमहासचिव व विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सहयोगी संचालिका प्रा.डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.
उमा भारती म्हणाल्या,“आजच्या काळात बौद्धिक युद्ध सुरू झाले आहे आणि महिला या सरस्वती असल्यामुळे त्यांच्या हातात पॉवर आहे. या देशात पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा महिलांना राजकारणात मोठे मंत्री पद दिले. त्यांनी आपल्या आईला सदैव समोर ठेवले यावरून स्त्री शक्ती मोठी आहे हे दिसून येते. जेव्हा मी संसद भवन मध्ये पोहचले तेव्हा मला महिला होण्याचा चांगलाच अनुभव आला. राजकारणामध्ये हिंदूवाद हा राष्ट्रवाद आहे. तरीपण या देशात सर्वांनी आपआपल्या धर्माचे पालन करून दुसर्यांना सन्मान दयावा.”
वसुंधरा राजे सिंधिया म्हणाल्या, “बेटी बचाओ, बेटी पढाओ हा नारा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नवीन भविष्य निर्माण करीत आहे. महिलांना सशक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवित आहेत. महिलांना कधीही कमकवूत समजू नका, कारण कोविडच्या काळात महिला डॉक्टर आणि नर्सेस यांनी या देशात खूप महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. आज देशातील प्रत्येक महिलेने उच्च शिक्षण घेतले तर येणारी पिढी ही कधीही अशिक्षित राहणार नाही. मी राजस्थानची मुख्यमंत्री असतांना महिला उन्नतीसाठी येथे योजना राबविल्या. त्यामुळे महिलांनी बर्याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.”
आनंदीबेन पटेल म्हणाल्या,“महिलांनी राजकारण, आर्थिक, सामाजिक क्षेत्राबरोबर सर्वंच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. तरी सुद्धा त्यांना अन्य क्षेत्रांमध्ये सामवून घेणे ही काळाची गरज आहे. एकीकडे भारतीय संविधानाने महिलांना न्याय दिला. परंतू समाजातील काही विकृत मानसिकेतेमुळे महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय व अत्याचार होतांना दिसत आहे. या देशात महिला सशक्त झाल्या तर देश सशक्त होईल. देशाला कुपोषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला व मुलांसाठी विशेष योजना राबविल्या आहेत. देशात ६९ टक्के मृत्यू हे कुपोषणामुळे होत आहेत. त्यामुळेच सुरक्षित भविष्यासाठी मुले आरोग्यदायी राहणे गरजेचे आहे.”
रेणुका सिंग सरुता म्हणाल्या,“महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचा आवाज पोहविण्यासाठी हा मंच सर्वोत्तम आहे. महिला आज आंगणापासून अंतराळ क्षेत्रापर्यंत व पंचायतीपासून ते संसदेपर्यंत पोहचल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ या नारा दिल्यानंतर त्याला देशातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. महिलांना आर्थिक सक्षम करणे गरजेचे असून त्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी. देशात वेगवेगळ्या राज्यांनी महिलांसाठी चांगल्या योजना राबविल्या आहेत. तसेच, पंतप्रधान यांनी महिलांना ही लष्करी सेेवेमध्ये योग्य न्याय दिला आहे.”
देवाश्री चौधरी,“भारतीय संस्कृती ही महिला संस्कृतीशी जुळलेली आहे. महिलांनी स्थानीय राजकारणात आता मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा. मोदी सरकारच्या काळात या देशाच्या विकासाबरोबरच महिलांना योग्य न्याय मिळत आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविला आहे.”
कैलास खेर म्हणाले,“नारी ही सर्वांच्या हदयाची शक्ती आहे असे संबोधल्या जाते. महिलांना अष्टधारी शक्ती असे ही म्हटले जाते. आजच्या काळात माता पितांची सेवा करणे हे सर्वात मोठे भाग्य आहे. त्यामुळे महिलांनी त्यांची सेवा करून वृध्दाश्रम संपवावे. येणार्या काळात एकत्र परिवाराची संकल्पना पुन्हा आणण्यासाठी नव्या पिढीला ज्ञान द्यावे.”
डॉ.मल्लिका साराभाई म्हणाल्या,“महिलांसाठी सध्या संपूर्ण जग खुले आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून सिद्ध करून दाखविले आहे. तसेच, सरकारी क्षेत्रातही महिलांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.”
पॅट्रीशिया स्कॉटलँड म्हणाल्या, “सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरूषांच्याबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्रियांना समानतेचा अधिकार देणे गरजेचे आहे. त्यातूनच समाजाची उन्नती होईल.”
रितू छाब्रिया म्हणाल्या, “या संसदेत पुढील तीन दिवस नवीन शिकण्यासाठी खूप काही आहे. भारत हा प्रगतीशील देश असून आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती करीत आहे. समाज उन्नतीसाठी शिक्षण हे सर्वात महत्वाचे आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव व अतिथी देवो भवची परंपरा भारतात आहे. आज जगामध्ये कुटुंब पद्धतीचा र्हास होत चाललेला आहे. परंतू भारतात मात्र कुटुंब पद्धती ही टिकूण आहे. भारतात आईचे स्थान सर्वोच्च असून तीला ईश्वराचा दर्जा दिला आहे. त्यामुळे महिलांना समाजाच्या प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण केल्यास देशाचा विकास होईल.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“आंध्रप्रदेश येथे आयोजित प्रथम महिला संसदेसाठी चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सरकारने उत्तम प्रकारे सहयोग दिला होता. येथे सर्व क्षेत्रातील महिलावर्गांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले होते. महिलासांठी शिक्षण हे महत्वाचे आहे. समाजनिर्मितीसाठी त्यांची भूमिका खूपच महत्वाची असणार आहे.”
डॉ. एन.टी. राव यांनी महिला संसद भरविण्या मागची भूमिका स्पष्ट केली.
प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अदिती राहुल कराड यांनी आभार मानले.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणे गरजेचे सुश्री उमा भारती यांचा सल्ला
Date:

