पुणे : “तंत्रज्ञानातील उत्क्रांतीमुळे मानवी जीवन सुधारण्यासह दैनंदिन गरजा पुरविण्याला हातभार लागतो. डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडिया, ई-लर्निंग या गोष्टींकडे फॅशन किंवा फ्याड म्हणून बघता कामा नये. कारण डिजिटल होणे ही आजच्या शिक्षणाची गरज आहे,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षण व विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे यांनी केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च (एमआयटीएसओईआर) आणि द लर्निंग कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एम्पॉवरिंग ई-जनरेशन : व्हिजन 2020’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अमेरिका येथील वेन स्टेट युनिव्हर्सिटी, डेट्रॉईट येथील प्राध्यापिका डॉ. जझलिन ईबेनेजर, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. टी. एन. मोरे, डॉ. आसावरी भावे-गुडीपुडी, प्रा. पी. एन. प्रसाद, प्रा. यश पाल, प्रा. सुलभा देशपांडे आदी उपस्थित होते.
डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, “शिक्षण, आरोग्य आदी व्यवस्था आपण निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यात असलेल्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त आहे. मात्र, ते विद्यार्थी दशेतच आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा व्यवस्थेशी मेळ घालून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल, यावर शिक्षकांचा भर असला पाहिजे. त्यासाठी नव्याने येत असलेल्या तंत्रज्ञानाची ओळख प्रथम शिक्षकांनी करुन घेतली पाहिजे. अन्यथा शिक्षकालाच तंत्रज्ञानाविषयी गोडी नसेल, तर ते विद्यार्थ्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचणार नाही. सामान्यांचे, शेतकर्यांचे प्रश्न कसे सोडविता येतील, याचाही विचार शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालताना शिक्षकांनी केला पाहिजे.”
डॉ. जझलिन ईबेनेजर म्हणाल्या, “नवीन तंत्रज्ञान हे प्रगतशील शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, त्याचबरोबर विज्ञान, कथा आणि शिकविण्याचे कौशल्य तितकेच महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाचा कितीही वापर वाढला तरी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते कायम राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी गोडी निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने मूल्यांचे शिक्षण आपसूकच असते. त्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण योग्य पद्धतीने मिळाल्यास झपाट्याने प्रगती होऊ शकेल.”
प्रा. स्वाती कराड-चाटे म्हणाल्या, “एकविसाव्या शतकात शिक्षणाचे स्वरुप गतीने बदलत आहे. उच्च शिक्षणात आवश्यक कौशल्यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासह सतत बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचाही आपण शिक्षकांनी आढावा घ्यावा. मूल्याधारित शिक्षणासह तंत्रज्ञानाचे सखोल शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले, तर देशाच्या प्रगतीत मोठी भर पडेल.”
डॉ. आसावरी भावे-गुडीपुडी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अर्चना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आकांक्षा पांडे यांनी आभार मानले.

