पुणे, २४ जून: “वारी ही सदैव माणसाला चैतन्य प्रदान करीत असते. पालखीच्या माध्यमातून धर्म व संस्कृती शिकविली जातेे. समाजात पुढील पिढी टिकवायची असेल तर त्यांना वारीचे संस्कार देणे गरजेचे आहे. वारी ही आम्हाला आई-वडिलांची सेवा करण्याचे संस्कार शिकविते. म्हणून वारी ही संस्कारांची शिदोरी आहे.” असे अनमोल विचार देहू येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराज कोळोखे यांनी मांडले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थान असते. त्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व पहिले पुष्ण गुंफताना ते बोलत होते.
याप्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे, बाळासाहेब रावडे, ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर, बाळासाहेब काळोखे, तुकाराम काळोखे, रमेश काळोखे, ह.भ.प. शालीग्राम खंदारे, ह.भ.प. नलावडे महाराज हे उपस्थित होते.
ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराज कोळोखे म्हणाले “मानवाने जीवन का जगावे हे कळण्यासाठी अध्यात्म असते. या अध्यात्मातील ओंकाराच्या माध्यमातून सदैव ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच यातील शब्द संपत्ती ही भाव निर्माण करते आणि त्यातूनच परमार्थाकडे जाता येते. मानवाला जशी संगत असेल त्यावर जीवनाच्या बर्याच गोष्टी आधारित असतात. त्यामुळे संगत ही साधू संतांची ठेवल्यास जीवनात सदैव सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.”
“संत तुकाराम महाराजांनी या समाजाला शहाणे करण्यासाठी स्वतःचा अनुभव सांगितला. परंतू त्याचा हवा तेवढा परिणाम झाला नाही. तसेच १७ व्या शतकात मराठी भाषा लोप पावत चालली होती त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी ‘गाथा’ मराठी भाषेत लिहून ही भाषा टिकविली. शिक्षणापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे त्यांनी सांगितले. संत तुकाराम यांनी अध्यात्म क्षेत्रात केलेल्या कार्याला पाहुन संपूर्ण जगातील महान व्यक्ती प्रभावित झाले होते.
तसेच, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुध्दा तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण केले आहे. त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सारखे जगभरातील लाखो लोक त्याच्यापासून प्रभावित झाले होते. १८५७ साली मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अलेक्झांडर यांनी गाथा समजून घेऊन पहिली गाथा प्रकाशित केली. १८७९ मध्ये नेल्सन यांनी संत तुकाराम यांच्यावर ग्रंथ लिहिला.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले. “वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आळंदी व देहूचे नाव संपूर्ण जगात कोरले गेले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी संपूर्ण मानव जातीला सुख, समाधान आणि शांतीचा संदेश दिला आहे. कसे जगावे आणि जगू नये याबाबतचे मार्गदर्शन ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथातून मानवजातीला दिले आहे.
यानंतर जालना येथील ह.भ.प. डॉ. सुदाममहाराज पानेगांवकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. तसेच, संगीत अलंकार ह.भ. प. श्रीकृष्ण गरड गुरुजी व संगीत विशारद श्री. अनिरूध्दजी कारकर यांचा भक्तीस्वरगंध हा अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला.
वरील कार्यक्रमाचा इंद्रायणीच्या दोन्हीही तीरावरील लाखो वारकर्यांनी अध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला.
वारी ही संस्कारांची शिदोरी- ह.भ.प.श्री. विठ्ठल महाराज कोळोखे
Date: