पुणे- हजारो वर्षापासून भारतात गुरू-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपल्या संस्कृतीत गुरू आपल्या शक्तीशाली सूक्ष्म ज्ञानाला अतूट विश्वास व प्रेमभावाने शिष्यांपर्यंत पोहचवितात. असे विचार एमआयटी डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
गुरूपौर्णिमेनिमित्त युवराज मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. शिवलोक प्रतिष्ठानच्या सहकार्याने १०१ रोपे लावण्यात आली. त्यांच्या संवर्धनासाठी सुध्दा युवराज मित्रमंडळाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोथरूड-बावधन प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका सौ.अल्पना गणेश वरपे या होत्या. तसेच, नगरसेविका सौ.वैशाली मराठे, कार्यक्रमाचे संयोजक व युवराज मित्रमंडळाचे संस्थापक रवि दिघे हे उपस्थित होते.
प्रा.डॉ. मंगेश कराड म्हणाले, कोणत्याही अडथळ्याशिवाय चालत आलेली गोष्ट म्हणजे परंपरा आहे. ही ज्ञान देण्याची अतूट श्रृंखला आहे. पुढील वर्षाच्या गुरूपौर्णिमेपर्यंत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने पुणे शहरात व पुणे जिल्ह्यात जिथे जिथे मोकळी जागा उपलब्ध असेल तेथे ५००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
तसेच, शिवतीर्थनगर येथील दत्तमंदिरात भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात उपस्थितांना तुळशीची २५० रोपे वाटण्यात आली.
याप्रसंगी शिवलोक प्रतिष्ठानचे संस्थापक मुरलीधर कुंबरे, युवराज मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय गोडकर, किनारा फ्रेन्डस सर्कलचे अध्यक्ष मोहन घारे, अबोली पार्क मित्रमंडळचे अध्यक्ष दत्ता मारणे,शिवलोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश येनपुरे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच पै. चंद्रकांत मोहोळ, नितिन बोराडे, योगेश दिघे, उमेश कासार आदी उपस्थित होते.
यावेळी अल्पना वरपे, वैशाली मराठे, गणेश वरपे, रवि दिघे व अनिता चव्हाण यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाची प्रस्तावना रवि दिघे यांनी केली. योगेश दिघे यांनी आभार मानले.

