चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन…
पुणे: संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्णयानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. एमआयटी विश्व शांती विद्यापीठ पुणेतर्फे चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून गुरुवार, दि. २१ जून २०१८ रोजी सकाळी ६.३० वाजता कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराच्या निमित्ताने एमआयटी विश्व शांती विद्यापीठ, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सुमारे ५ ते ६ हजार विद्यार्थी या योग प्रशिक्षण शिबीरात सहभागी होणार आहेत.
पतंजली योग समिती (पुणे पश्चिमचे प्रमुख) योग शिक्षक श्री. गोविंद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे योग प्रशिक्षण शिबीर संपन्न होणार आहे. विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे १९९६ सालापासून दरवर्षी २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकरीता योग प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते. १९८३ सालापासून एमआयटी संस्थेच्या प्रांगणात धूम्रपान करण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व चारित्र्य संवर्धन व्हावे यासाठी योगाला नेहमीच प्रोत्साहन दिले जात आहे.
आजची तरुण पिढी चंगळवादी व व्यसनाधीन झालेली आहे. या पिढीची बौध्दिक व शारीरिक उन्नती व्हावी, यासाठी दररोज योगसने करावीत. याकरिता एमआयटी विश्व शांती विद्यापीठाने आयोजित केलेल्या योगप्रशिक्षण शिबीराचे विशेष महत्त्व आहे, असे मत पतंजली योगपीठाचे पुण्यातील प्रतिनिधी श्री. घाडगे गुरूजी यांनी व्यक्त केले.
एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात असलेल्या या योग प्रशिक्षण शिबीरात जास्तित जास्त लोकांनी व विशेषतः विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी केले आहे.