पुणे-“सर्व मानवजातीला एकत्रित आणण्यासाठी भविष्यात संत ज्ञानेश्वर घुमटाचे कार्य महान असून सर्व धर्मातील लोकांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य या माध्यमातून होईल. भव्य असा घुमट पाहिल्यावर येथूनच संपूर्ण विश्वात भव्य असा शांतीचा संदेश दिला जाईल.,”असा विश्वास जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी एमआयटी विश्वशांती विद्यापीठ व विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी पुणेतर्फे लोणीकाळभोर राजबाग येथे उभारण्यात आलेल्या घुमटाची पाहणी केल्यानंतर व्यक्त केला.
यावेळी सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ.विजय भटकर, डॉ. एडीसन सामराज, डॉ. जब्बार पटेल, डॉ. शरद देशपांडे, एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट,डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, , एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय, आदिनाथ मंगेशकर हे उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“एकीकडे थ्रीडी प्रिटिंगचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून येथील वास्तू मानव निर्मित असून अद्वितीय आहे. जगभरात माणसाची जागा मशीनने घेतली आहे. पण, येथे मशीनची जागा माणसाने घेतली आहे. सर्वांना एकत्रित कसे आणता येईल, याचे हे उत्तम उदाहरणच म्हणता येईल. भव्य वास्तूची निर्मिती झाल्यावर संपूर्ण जगात पुण्याची ओळख ही या वास्तूच्या माध्यमातूनच होईल.
“जागतिक प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाऊन एमआयटीने मानवी घटकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. याची निर्मिती झाल्यावर जगभरातील पर्यटक ही वास्तू पहावयास येतील. आध्यात्मिक भारतभूमीचा जगापुढे कोणता संदेश दयावयाचा आहे, हे ठरवून योग्य ती टॅग लाईन देण्याचा सल्ला ही त्यांनी दिला.”
डॉ.विजय भटकर म्हणाले,“२१व्या शतकातील ही सर्वात भव्य दिव्य अशी वास्तू आहे. त्यामुळे जगभरात भारताची एक वेगळी ओळख निर्माण होईल. येथील अद्वितिय वास्तूची विशेषता ही आहे, की मशीनचा वापर कमी असून मानवी घटकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भारत मातेच्या चरणी अर्पित अशा या वास्तूची सुरूवात १२ वर्षांपूर्वी झाली. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी निर्मित अशी या वास्तूची निर्मिती झालेली आहे. या वास्तूचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, तसेच २ ऑक्टोबर २०१८ रोजी उद्घाटन करण्याचा मानस आहे. येथे निर्मित वर्ल्ड पीस लायब्रेरी व वर्ल्ड पीस प्रेयर हॉल जगाला शांतीचा संदेश देईल.”
संत ज्ञानेश्वर घुमटाच्या माध्यमातून जगभरात पोहोचेल शांतीचा संदेश
Date:


