पं. अतुलकुमार उपाध्ये यांची भावना; ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’चे उद्घाटन
पुणे, दि. 31 : “एमआयटी सांस्कृतिक संध्या या संगीताच्या कार्यक्रमात अनेक तरूण कलावंत आपली सेवा सादर करीत आहेत. त्यांच्यातील सुप्त गुणामधून भावी काळात संगीत सम्राट तानसेन व भारतरत्न भीमसेन जोशी यांच्यासारखे कलाकार निर्माण होतील.” अशी भावना प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी व्यक्त केली.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधारा येथे आयोजिलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सांस्कृतिक संध्येचे हे दहावे वर्ष आहे.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, डब्लूसीपीएचे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टिन, सौ. मार्टिन, डब्लूसीपीएचे मानद सल्लागार स्वामी अग्नीवेश, लखनौचे माजी महापौर डॉ. दाऊजी गुप्ता, सुप्रसिध्द पत्रकार श्री. वेदप्रताप वेदिक, स्वामी आर्यवेश, माईर्स एमआयटीचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
पं. अतुलकुमार उपाध्ये म्हणाले,“मी स्वतः एक व्हायोलिनवादक आहे. अशी 50 वाद्य वाजत असली, तरी त्यातून एकच सूर ऐकावयास मिळतो. हा सूर मानवी आवाजाशी अतिशय मिळता जुळता आहे. हे पाश्चात्य वाद्य भारतीय शास्त्रीय संगीताने स्वीकारले आहे. ही वैश्विक चळवळच म्हणावी लागेल. ”
“ श्री. ताकहिरो आराई याच्यासारखा जपानी तरूण संतूरसारखे आवघड वाद्य वाजवितो, यामधून मानवी एकात्मतेचे दर्शन होते. ही या उपक्रमाची मोठी उपलब्धी आहे. ”
डॉ. ग्लेन मार्टिन म्हणाले, “संगीत हे सर्व विश्वाला जवळ आणणारे एक प्रभावी माध्यम आहे. माझ्यासारख्या पाश्चात्य व्यक्तीलासुध्दा हे भारतीय संगीत आपलेसे वाटते.”
स्वामी अग्नीवेश म्हणाले, “सामवेदामधून संगीताचा उगम झाला. ते आत्म्याला शिक्षण देण्याचे कार्य करते. आत्मा व परमात्मा यांना एकरूप करणारे हे नादब्रह्म आहे.”
श्री. दाऊजी गुप्ता म्हणाले, “राजनीती ही माणसामाणसात दरी निर्माण करते. संगीत, कला व संस्कृती ही मात्र सर्व मानवजातीला एकत्र जोडण्याचे काम करते. काव्य, शास्त्र व संगीत हा काळाचा सदुपयोग आहे.”
श्री. वेदप्रताप वेदिक म्हणाले, “पुण्यनगरी ही भारताची सांस्कृतिक राजधानी आहे. एमआयटी सांस्कृतिक संध्येने पुण्याच्या वैभवात भर घातली आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “संगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती मिळते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे काहीसा भारतीय संस्कृतीचा आजच्या पिढीला विसर पडत चालल्याचे दिसत आहे. तो परिचय त्यांना व्हावा, यासाठी हा उपक्रम आहे.”
डॉ. संजय उपाध्ये यांनी सूत्रसंचालन व कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. श्री.आदिनाथ मंगेशकर यांनी आभार मानले.
एमआयटी सांस्कृतिक संध्येची सुरुवात श्री. तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने झाली. त्यानंतर श्री. तेजस उपाध्ये, श्री. ताकहिरो आराई, श्री. अझरूद्दीन शेख व श्रीमती गोदीवरीताई मुंडे यांनी आपली संगीताची सेवा सादर केली.

