पुणे: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी व विश्वशांती संगीत कला अकादमी, राजबाग, पुणे यांच्यातर्फे शनिवार, दि. ३० व रविवार, दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.१५ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर,पुणे येथे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस रंगणार्या या ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, दि. ३० डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता थोर समाजसेवक मा. श्री.अण्णा हजारे हे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात मध्यप्रदेश सरकारच्या तानसेन सन्मानाचे मानकरी पंडित उल्हास कशाळकर यांचा विशेष सत्कार होणार आहे.
अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्या या संगीत महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक पंडित उध्दवबापू आपेगावकर (शिंदे), शास्त्रीय संगीत गायक श्री. समीहन कशाळकर, सुप्रसिद्ध गायिका सौ. शुभांगी मुळे, सुप्रसिध्द गायक श्री. सुरंजन खंडाळकर, सुप्रसिध्द व्हायोलिनवादक श्री.तेजस उपाध्ये आणि सुप्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे हे आपली कला सादर करतील. दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी विश्वशांती संगीत कला अकादमीचे शिक्षक व विद्यार्थीदेखील आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात शहनाई वादनाने होईल.
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुध्द प्रतिपदा ‘गुढी पाडवा’ हाच खर्या अर्थाने नववर्ष दिन म्हणून ओळखला जातो. तथापि, ३१ डिसेंबरचा दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्चात्य स्वरूपातील जल्लोषात सर्व भारतात व जगातही साजरा केला जातो. परंतु, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्वशांती संगीत कला अकादमी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरूण वर्गाच्या मनामध्ये ‘स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व’ जागवून खर्या अर्थाने ‘भारतीय अस्मिता’ जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. ‘एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या’ कार्यक्रमातून ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांत रसाची अनुभूती’ देणारा एक आगळावेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.
विश्वशांती गुरुकुल येथील विश्वराज बंधार्याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिरस्वरूपी श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाजलदेवता या तीन विशेष मंचांवरून शांतरसाची अनुभूती देणारा ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ हा विशेष कार्यक्रम दरवर्षी ३० व ३१ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दि. १ जानेवारी २०१८ रोजी सुरू होणार्या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत, तसेच तरुण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. एमआयटी सांस्कृतिक संध्येचा समारोप दि. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देऊन, स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे पुढील २०१८ हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल.
या सांस्कृतिक संध्येच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नाद-ब्रह्म-स्वरूपी ‘संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन व शांतरसाची अनुभूती’ घ्यावयाची असेल, त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.