दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल बनले या संसदचे सभापती
पुणे : शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या, जीएसटी, प्राथमिक शिक्षण, आंगणवाडी आणि बुलेट ट्रेन यासारख्या महत्वपूर्ण मुद्यांवर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) च्या अभ्यासक्रमा अंतर्गत आयोजित अभिरूप संसद सत्र-२०१७ मध्ये खडाजंगी झाली.
अभिरूप संसद सत्र -२०१७ चे सभापती दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल हे होते. तसेच, अभय अलोदे (पंतप्रधान), पुलकित (गृह मंत्री), मिहिर (अर्थ मंत्री), हिमांशू (कृषी मंत्री) व नलिनी देवी (रेल्वे मंत्री) यांच्याबरोबरच कित्येक विद्यार्थ्यांनी सत्ताधारी पक्षाचे खासदार बनून देशाच्या महत्वपूर्ण मुद्यांवर आपली बाजू मांडली. तसेच, विरोधी पक्षाकडून विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली. विरोधी पक्षनेता विक्रम बनकर याच्याबरोबरच कित्येक विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षीय खासदार बनून सत्ताधार्यांना देशातील प्रमुख समस्यांवर कोंडित पकडले.
देशातील शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या, त्यांची दयनीय स्थिती यावर विरोधकांनी प्रकाश टाकल्यानंतर कृषीमंत्री बनलेले हिमांशू गुप्ता यांनी उत्तर दिले की, सरकार सिंचन, पशुपालन, कृषी उद्योग, जोडधंद्यासारख्या ग्रामीण क्षेत्राशी निगडित अशा गोष्टींवर सरकार लक्ष केंद्रित करीत आहेे. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्थेतही त्याचे नियोजन केले गेले आहे. पंतप्रधानांचे स्वप्न आहे कि, २०२२ या वर्षापर्यंत प्रत्येक शेतकर्याचे उत्पन्न दोन पटीने वाढेल. याच वर्षापर्यंत देशातील कोणताही शेतकरी उपाशी पोटी राहणार नाही. मनरेगा मध्ये ४८ हजार कोटी रूपयांची तरतूद करून लोकांना रोजगार देण्यात येईल.
प्राथमिक शिक्षण या विषयावर सरकार काय करीत आहे, तसेच शिक्षणाची दिशा नेमकी कशी आहे, या, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना पंतप्रधान म्हणाले, सबका साथ सबका विकास हा आमच्या सरकारने शिक्षणाशी जोडला आहे. सरकारी शाळांच्या स्थितीत सुधारणा करून प्रत्येक राज्यातील अंगणवाड्यांची समस्या सोडविण्यावर आम्ही कार्य करीत आहोत. तसेच, देशात केद्रीय शाळा मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येईल.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशात बुलेट ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याचे सरकारचे स्वप्न आहे. मुंबई ते अहमदाबाद येथे धावणार्या पहिल्या ट्रेन साठी जपान कडून ८८ हजार कोटी रूपयांचे कर्ज मिळाले आहेे. बुलेट ट्रेन मुळे १५ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
विरोधी पक्षाने जीडीपी व वाढत्या बेरोजगारीची समस्या उपस्थित केली. त्यावर गृहमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले, भारत विकासाच्या दिशेने जोरदार वाटचाल करीत आहे. जीडीपी थोडे खाली आले. परंतू हे कायम टिकणार नाही. त्यामुळे येणार्या काही दिवसांमध्येच भारत आर्थिक शक्ती म्हणून उद्यास येईल.
यानंतर शेतकर्यांची आत्महत्या व जीएसटी विषयावरून सदनामध्ये खडाजंगी झाली. त्यावर सभापती रामनिवास गोयल म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी सत्ताधारी व विरोधकांनी मिळून हे मतभेद शांततापूर्ण मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशातील प्राथमिक शिक्षणाचा स्तर उंचवला पाहिजे. यासाठी देशात केंद्रीय शाळेची संख्या वाढवावी. अंगणवाडीत कार्यरत शिक्षकांना सरकारी कार्यांपासून व राजकीय पक्षांच्या कार्यापांसून दूर ठेवावे.
अभिरूप संसद-२०१७ संदर्भात मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास म्हणाल्या, देशाचे संसद सत्र कसे चालते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून या सत्राचे आयोजन केले आहे. येथे विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष आप-आपले डावपेच कसे लढवितात, आपले मुद्दे कसे मांडतात, विरोधी पक्षांप्रमाणे मंत्री कशा पद्धतीने प्रभावशाली उत्तर देतात, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थींना मिळतो. याचा उपयोग या विद्यर्थ्यांना त्यांचा राजकीय कारकीर्दीत निश्चितपणे होईल.
यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी अभिरूप संसद-२०१७ बद्दल समाधान व्यक्त केले.


