पुणे : डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांच्या पहिल्या सरपंच संसदेचे दि. १०, ११ व १२ डिसेंबर २०१७ दरम्यान एमआरटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात आरोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून १२०० सरपंच या तीन दिवस चालणार्या सरपंच संसदेत सहभागी होणार आहेत.
या सरपंच संसदेचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. १० डिसेंबर २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. या समारंभासाठी सुप्रसिध्द कृषी तज्ञ पद्मश्री श्री. सुभाष पालेकर, माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी, माजी विभागीय सहआयुक्त श्री. श्याम देशपांडे व चाकण येथील मेदनकरवाडीच्या सरपंच व मिटसॉगच्या माजी विद्यार्थिनी कु.प्रियांका मेदनकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संसदेचा समारोप समारंभ मंगळवार, दि.१२ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. या समारंभासाठी भारताचे माजी केंद्रीय मंत्री श्री. मणीशंकर अय्यर, राज्य सभेचे खासदार डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे, सुप्रसिध्द कृषी तज्ञ पद्मश्री श्री. सुभाष पालेकर व महाराष्ट्र राज्याच्या आदर्श ग्राम योजनेचे कार्यकारी संचालक श्री. पोपटराव पवार हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या तीन दिवसीय सरपंच संसदेमध्ये ५ सत्रे आरोजित केली आहेत.या संसदेतील सत्रे खालीलप्रमाणे :
सत्र १ : महाराष्ट्र सरकार आणि ग्रामविकास.
सत्र २ : आदर्श गाव : नेतृत्व आणि सहभाग.
सत्र ३ : ग्राम विकास योजना, अंमलबजावणी आणि आर्थिक स्त्रोतांचे नियोजन.
सत्र ४ : ग्राम विकास आणि तंत्रज्ञान.
सत्र ५ : पाणी प्रतिष्ठानचे कार्य आणि नव्या जलस्त्रोतांची निर्मिती.
याशिवाय विशेष अशा दोन ‘सरपंच टू सरपंच कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले आहे.
या तीन दिवस चालणार्या सरपंच संसदेत सुप्रसिध्द कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, महाराष्ट्र सोशल व्हिलेज ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशनच्या प्रमुख समन्वयक श्रीमती श्वेता शालिनी, सुप्रसिध्द उद्योजक श्री. प्रदीप लोखंडे, दैनिक तरूण भारतचे कार्यकारी संपादक व पटकथा लेखक श्री. श्याम पेठकर, खासदार श्री. राजू शेट्टी, ज्येष्ठ पत्रकार श्री. अनंत दीक्षित, पीएमआरडीएच्या उपकार्यकारी अधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर, अर्थतज्ञ श्री. अभय टिळक, तिसरी सरकार अभियानाचे संस्थापक श्री. चंद्रशेखर प्राण, पाटोद्याचे सरपंच श्री. भास्करराव पेरे पाटील, शेतकरी नेते व माजी आमदार श्री. पाशा पटेल, श्री. संतोष मंडलेचा, मुंबईच्या दै.लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार श्री. योगेश बिडवाई, जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. शरद बुट्टे पाटील, श्री. हिमांशू पटेल, यशदा, पुणेचे डॉ. सुमंत पांडे, राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार श्री. विजय पांढरे, सुप्रसिध्द भूगर्भ शास्त्रज्ञ श्री. सुरेश खानापूरकर व भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री. माधव भंडारी इत्यादी मान्यवर या सरपंच संसदेत मार्गदर्शन करणार आहेत.
ग्रामीण भागातील सरपंचांना एकत्रित आणून त्यांचे प्रबोधन करण्यासाठी आणि त्यांना नामांकित उद्योगधंद्यांच्या सहकार्यातून नवीन तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य व शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करणे. तसेच, शासनाच्या योजना व एकंदरीत ग्रामीण विकासाची दिशा या संबंधीची माहिती व्हावी, या उद्देशाने ही सरपंच संसद भरविण्यात येत आहे.
अशी माहिती डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, सरपंच संसदेचे समन्वयक श्री. योगेश पाटील व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या संचालिका डॉ. शैलश्री हरीदास यांनी दिली.

