औरंगाबाद : महावितरणकडून शहरातील दलित आणि मुस्लिम भागातच आठ ते नऊ तासांचे लोडशेडिंग केले जात असल्याचा आरोप करत एमआयएमने महावितरण कार्यालयात तोडफोड केली. आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मिलकॉर्नर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात एमआयएमच्या दोनशे अडीचशे कार्यकर्त्यांनी संरक्षक जाळ्या तोडत प्रवेश केला. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे आपल्या दालनात उपस्थित नसल्याने एमआयएम कार्यकर्ते अधिकच संतापले. जनतेला लोडशेडिंगचे चटके देता आणि तुम्ही एसीची हवा खाता म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनातील एसीच उखडून फेकला. दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा महावितरण कार्यालयात गोंधळ सुरु होता.
शहराच्या विविध भागात सध्या महावितरणकडून लोडशेडिंग केले जात आहे. परंतु शहरातील मुस्लिम आणि दलित बहुल भागात महावितरणकडून जादाचे लोडशेडिंग केले जात असल्याचा एमआयएमचा आरोप होता. या संदर्भात आज (ता. 6) दुपारी तीनच्या सुमारास इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमच्या दोनशेवर कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे कार्यकर्त्यांनी संरक्षक भितीच्या जाळ्या तोडून कार्यालयात प्रवेश केला.
हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांचे दालन गाठले. आमदार इम्तियाज जलील, जिल्हाध्यक्ष अब्दुल रहिम नाईकवाडी हे यावेळी दालनात गेले तेव्हा तिथे मुख्य अभियंता नव्हते. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते अधिकच भडकले. लोकांना उकाड्यात आणि अंधारात ठेवून इथे एसीची हवा घेतली जात असल्याचे म्हणत काही कार्यकर्त्यांनी दालनातील एसी, टेबलावरील काच, फोन उखडून फेकले. त्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले.