अहमदाबाद –तौक्ते वादळ गुजरातमध्ये आज रात्री 9 ते 10 पर्यंत गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर धडकेल. वादळ पोरबंदर आणि महुवा (भावनगर) मधून पुढे जाईल. या दरम्यान वादळाची गती 175 किलोमीटर प्रतितास राहू शकते. सध्या गुजरातच्या किनारपट्टी भागातील जवळपास 1.5 लाख लोकांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पश्चिम किनारपट्टीवरुन हजारो घरे रिकामे करण्यात आले आहेत. भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) चे डायरेक्टर जनरल (DG) मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, राज्यातील 17 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) चे डायरेक्टर जनरल एस एन प्रधान यांनी सांगितले की, 7 जिल्ह्यात NDRF चे 100 पेक्षा जास्त पथक तैनात करण्यात आले आहेत. वादळाचा सर्वात जास्त फटका गुजरातला बसू शकतो. सध्या गुजरातमध्ये 50 टीम तैनात आहेत.गुजरातमध्ये 23 वर्षानंतर इतके मोठे वादळ आले आहे. यापूर्वी, 9 जून 1998 मध्ये कच्छ जिल्ह्यातील कांडलामध्ये वादळ आले होते. त्यात 1173 लोकांचा मृत्यू आणि 1774 जण बेपत्ता झाले होते.
‘तौक्ते’ वादळाने गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकासह 7 राज्यात हाहाःकार माजवला. या वादळामुळे 5 राज्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात मुंबई किनारपट्टीवर असलेल्या अनेक जिल्ह्यात लसीकरण बंद करण्यात आले आहे. तसेच, मुंबईसह अनेक शहरांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ मंगळवारी सकाळी पोरबंदर आणि महुवा (भावनगर) दरम्यान गुजरातच्या किनारपट्टीवर धडकू शकते. यादरम्यान, या वादळाचा वेग 185 किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहचू शकतो.
कोणत्या राज्यात किती मृत्यू
कर्नाटकच्या विविध जिल्ह्यात आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील जळगावमध्ये रविवारी दुपारी एक झाड झोपडीवर पडल्याने 17 आणि12 वर्षांच्या दोन बहिणींचा मृत्यू झाला,तर आईची तब्येत गंभीर आहे. तसेच, गोवा राज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तिकडे तमिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये भिंत कोसळून दोनजण दगावले आहेत.
गुजरातला सर्वाधिक फटका
हवामान विभागाने सांगितले की, या वादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसेल. द्वारका, कच्छ, पोरबंदर, जुनागड, गिर सोमनाथ, अमरेली, राजकोट, मोरबी आणि जामनगर जिल्ह्यातील कच्चे घर पूर्णपणे उद्धवस्त होतील, तर पक्क्या घरांनाही काही प्रमाणात नुकसान पोहोचेल.

