पुणे-‘वाट पाहीन पण पीएमटीनेच जाईन’ हे वाक्य अनेकांना कुठे तरी वाचल्याचे आठवत असेल,रस्त्याच्या बाजूला बसलेली युवती..आणि त्यावर तिच्या मनाचे लिहिलेले हे बोल असे चित्रही अनेकांनी पाहिलेले असेल आठवतही असेल अनेकांना…पण आता तो जुना जमाना झाला,पीएमटी ची जागा पीएमपीएमएल ने घेतली. त्यापुढे जाऊन ओला,उबेर आल्या,रिक्षात हि काही बदल झाले पेट्रोल,डीझेल च्या रिक्षा सी एन जी वर धाऊ लागल्या,त्या रिक्षावाल्यांनाही बरी कमाई झाली. या काळातही तोट्यात का होईनात,ठेकेदाराकडून गाड्या घेऊन का होईनात पीएमपी सुरूच होती,मेट्रो येणार म्हणून..कात टाकू पाहत होती..बीआरटी जरी फेल गेली तरी लोकसेवेची स्वप्ने उराशी घेऊन पीएमपीएमएलने इलेक्ट्रिक बसेस ची भरारी घेतली.आणि आज हजारो कोटींच्या मेट्रोचे आगमन झाल्यावरही ना पीएमपी हटली ना रिक्षा हटली..हि दोघेही धावतच आहेत.मेट्रो आली,मेट्रो आली म्हणून ..पाहुण्याच्या आदरातिथ्याप्रमाणे मेट्रोचे पुणेकरांनी स्वागतही भरभरून केले,कुणी तर यामुळे अगदी हवेत तरंगू लागले,पण मेट्रो पाहुणी म्हणून नव्हती आली ती तर इथे कायमचीच राहायला आली होती. पण म्हणतात ना,शितावरून भाताची परीक्षा..अगदी तसेच झाले..वनाज ते गरवारे कॉलेज असा टप्पा मोठ्या दिमाखाने करोडो रुपयांच्या जाहिराती ,डामडौल करून गाजावाजा करून सुरु केला तर खरा..पण नव्याची नवलाईच ती..अखेर कोंबडे किती काळ झाकून ठेवणार .. मेट्रोच्या कौतुकाचा बहर जाहिरातबाजीच्या पैशांच्या धुक्यात कधी तरी विरणार होताच म्हणतात ना काळ जबरदस्त असतो, तो भल्या भल्याची भाषा बंद करतो…आणि चक्क उन्हाळा आलाच…पाने च्या पाने मेट्रोच्या कमतरता दाखवू लागली..मेट्रो केवळ इथेच नव्हती फसली,या कमतरता दूर मेट्रो करेलही..पण पुणेकरांची व्यवहार्यता,विश्वासाहर्ता मिळवायला मेट्रोला स्पर्धा करावी लागेल ती पीएमपी आणि रिक्शाशी… ई बाईक, सायकल चा तमाशा..पूर्वी होऊनच गेलेला होता त्यावर शेकडो कोटींची खैरात ज्याच्या त्याच्याकडे पोहोचलेली होती आणि ते काही खरे नाही हे अनेकदा सांगूनही लालचावलेली लॉबी बरोबर आहे म्हणून सांगणाऱ्याकडे दुर्लक्ष करणे हि पायापुरतेच ठरल्याचेही स्पष्ट झाले.पण या राजकीय इतिहासाशी देखील पुणेकरांना घेणे देणे नाही…ज्यांनी दिल्लीच्या मेट्रोचा वापर केला,मुंबईच्या मेट्रोचा वापर केला त्यांना कोथरूडच्या मेट्रोत स्वारस्य नसले तरी आपल्या शहरात आलेली मेट्रो म्हणून स्वागत मनापासूनच केले. पण हीच मेट्रो आता अव्यवहार्य असल्याचे दिसू लागल्याने या मेट्रो कडे लोक पाठ फिरवू लागतील काय ?या प्रश्नाची हि वास्तवता मात्र कोणाला नाकारता येणार नाही. थेट मुद्द्यावरच येऊ यात. मेट्रो वनाज हून गरवारे कॉलेज पर्यंत १ प्रवासी घेऊन येते ते २० रुपयात..आणि पीएमपीएमएल वनाज हून डेक्कन कॉर्नर पर्यंत १ प्रवासी घेऊन येते ते केवळ १० रुपयात…मेट्रो आल्यावर सर्वात जास्त धोका पीएमपीएमएल ला होता असे बोलले जायचे पण हे खोटे ठरले. जिने चढून वर जा,खाली उतरा,लिफ्ट आहे पण त्यात गर्दी भारी ..मेट्रो एसी आहे पण पिएमपी ची इलेक्ट्रिक बस हि आहे न्यारी ..बरे वेळेचे काय..नाही ओ कर्वे रस्त्यावर उड्डाणपूल झाल्याने आता. मेट्रो आणि बसच्याच काय रिक्षाच्या हि वेळेत काही फरक पडत नाही.बरे रिक्षाचे दर किती होतात ? वनाज ते गरवारे कॉलेज रिक्षाचे मीटर प्रमाणे भाडे होते ५५ रुपये.. रिक्षात तिघे येतात ५५ रुपयात.. इथे हि रिक्षा मेट्रोला भारीच पडते.आणि खरे सांगायचे तर सायकलीचे शहर कधीच दुचाकींचे शहर बनले आहे..या शहरात,पोट भरायला आलेल्या प्रत्येकाला, ज्याला कामानिमित्त सतत शहरात फिरावे लागते त्याला ना मेट्रो परवडते,ना रिक्षा परवडते ना बसने योग्य ठिकाण वेळ साधता येते,त्याला दुचाकी आजही आवश्यक आहेच. भले मेट्रो चालविण्यासाठी ५० हजाराची दुचाकी सरकारने ८० हजारावर नेऊन ठेवली आहे ७० रुपयांचे पेट्रोल ११० च्या पुढे पोहोचविले आहे हि मुस्कटदाबी या खाजगी वाहनचालकांच्या लक्षात ..बीआरटी आणली तेव्हापासूनच आलेली आहेच. वाढत्या महागाईत कमी होत चाललेल्या उत्पनात त्याने मेट्रोची ‘शितावरून..परीक्षा केलेली आहेच तेव्हा ..
मेट्रो ची संपेल नवलाई…अन पाहू या..कोण कुणाला भावतंय लई…
असेच म्हणावे लागेल.शेवटी वाहतुकीची समस्या मेट्रो आल्याने ना दिल्लीत संपुष्टात आली ना मुंबईत,मग ती पुण्यात येईल काय याचे हि उत्तर काल देईलच कशाला आपण घाई करावी.. ?

