पुणे : पुणेकरांना प्रतीक्षा असणार्या मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी आज कॅबिनेट कडे पाठवण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. पुणे मेट्रो संदर्भात दिल्ली येथे केंद्रीय अर्थसचिवांच्या अध्यक्षतेखाली पीआयाबीची बैठक झाली. या बैठकी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. कॅबिनेटकडूनही या प्रस्तावाला लवकरात लवकर मान्यता मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा नारळ फोडला जाईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणे शहरासाठी आजचा दिवस संस्मरणीय आहे. गेली अनेक वर्षे वेग – वेगळ्या कारणांनी प्रलंबित असलेला पुणे मेट्रोचा विषय पीआयबी कडून कॅबिनेट कडे मंजुरीसाठी आज पाठवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात मेट्रोचे जाळे पसरवण्यासाठी आग्रही असल्यामुळे पुढील काही दिवसात होणार्या कॅबिनेट मध्येही हा विषय मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. पुणे शहरात दरवर्षी अनेक लोक अपघाताला बळी पडतात, पुण्याच्या वाहतुकीच्या समस्येला सामान्य पुणेकर ही वैतागला आहे. त्यामुळे सामान्य पुणेकरांसाठी मेट्रोचा प्रस्ताव कॅबिनेटच्या मंजुरीसाठी ठेवणे हा एक आशेचा किरण आहे. बाराहजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी 20 टक्के रक्कम केंद्र सरकार , 20 टक्के रक्कम राज्य सरकार, 10 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था देणार आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात उभा करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास नऊशे कोटी रुपये किंमतीची जमीन गृहीत धरली आहे. पण पुण्याच्या विकास आराखडयात पुणे मेट्रोसाठीची जमीन राखीव ठेवली आहे. या विकास आराखड्याला पुढील महिन्याभारत मंजूरी मिळेल. प्रत्यक्ष रक्कम न देता टीडीआर च्या माध्यमातून ही जमीन महापालिकेच्या ताब्यात मिळेल. या प्रकारे यासाठी पुणे मेट्रोसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. आणखी निधीची आवश्यकता भासल्यास आणखी कर्ज उभे केले जाईल. या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर टेंडर निघेल. यात स्पर्धा होवून अत्यंत पारदर्शी पद्धतीने भविष्य काळात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या कामाला शुभारंभ केला जाईल. यामुळे पुण्याच्या विकास कामाला गती मिळेल. सार्वजनिक रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी, प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, खासदार अनिल शिरोळे, आयुक्त कुणाल कुमार, महापौर प्रशांत जगताप यांच्यासह पुणे मेट्रोसाठी प्रयत्न करणार्या सर्वांनाच पालकमंत्री या नात्याने यावेळी त्यांनी धन्यवाद दिले.