पुणे- छत्रपती संभाजी पुलावरून मेट्रो जाण्याचा विषय खूपच गाजला आणि राजकारण्यांच्या गदारोळात अखेरीस आहे त्या गोष्टी बरोबर मानून त्या स्विकारीत मेट्रोचा पुल संभाजी पुलावर आकार घेऊ लागलाय . हा पूल पाहिला आणि खालून जाणारी बस पाहिली तर कोणत्याही सिने दिग्दर्शकाला येथून मेट्रोतून खाली बसवर हिरो -व्हिलन यांच्या पाठ्लागातील थ्रील मानली जाईल अशी उडी मारण्याचा शॉट चित्रित करण्याचा मोह झाल्या शिवाय राहणार नाही . कारण अशी उडी देखील सहज शक्य आहे हे लोकही आता हा पुल पाहताक्षणी बोलू लागले आहेत .
इथे गणेश विसर्जन मिरवणुकीतील रथ कसे पार करता येतील हा काही कार्यकर्त्यांचा प्रश्न होता . अर्थात कोणी याला राजकीय प्रश्न होता अशी टिप्पणी देखील करेल . पण वास्तव काही दडून राहणारे नसते . येथून विसर्जन मिरवणूक नेताना बडी बडी धनाढ्य मंडळे स्वतःचे देखावे हायड्रोलिक म्हणजे खाली सरकणारे किंवा फोल्ड होणारे करू शकतील पण छोटी छोटी असूनही बडे बडे उंच देखावे करणारांना मात्र येथे एन्ट्री आता घेता येणार नाही त्यांना संभाजी पुलावरून त्यांना जोशी पुलाचा रस्ता दाखविला आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे .संभाजी पुलावरील मेट्रोचे काम पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास मेट्रो प्रशासनाने हाती घेतले. हे काम शुक्रवारी सकाळपर्यंत पूर्ण होत असल्याची माहिती मेट्रोच्या वतीने देण्यात आली . मेट्रोचे काम हाती घेतल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूने आणि खंडूजीबाबा व टिळक चौकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जंगली महाराज रस्त्यावरून येणारी वाहने गोखले रस्त्याकडे (फर्ग्युसन) वळवण्यात आली होती. तर कोथरुडकडून येणार्या वाहनांना संभाजी पुलाकडे जाण्यास मज्जाव करून ती गोखले रस्त्याकडे वळवण्यात येत होती. तसेच टिळक चौकातून पूलाकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करून वाहतूक केळकर रस्त्याकडे वळवण्यात आली होती. या बंदोबस्तासाठी जवळपास 75 पोलिस कर्मचारी व 6 अधिकारी तैनात करण्यात आल्याचे डेक्कन पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले.


