पुणे- आरक्षणामुळे गुणवंत मुलांना परदेशी जावे लागते असे नाशकात वक्तव्य झाले तेव्हा फारसे काही वाटले नाही ,जातीय आरक्षणाऐवजी निश्चितच गुणवत्तेवर आरक्षण असायला हवे ,शिक्षणावरही नाही ,कारण कित्येकदा जातच काय ,शिक्षण नसूनही गुणवान असलेली असंख्य व्यक्तिमत्वे देशाने पाहिलेली आहेत ; .त्यामुळे या विधानाचे कोणी काही मनावर घेतले नाही. लोकमान्यांनीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे ही ठामप्रतिपादन करून ,भाऊ रंगारीं गणपती मंडळाच्या बाबत संशयात्मक भूमिका ही महापौर असलेल्या मुक्ताताई आणि पालकमंत्री यांनी कायम ठेवली .तरीही सार्वजनिक गणेशोत्सवात लोकमान्यांचे योगदान सर्वमान्य असल्याने या विषयाचा गांभीर्याने फारसा विचार कोणी केला नाही . पण पुण्यात चक्क ब्राम्हण नसलेल्या स्त्रीने स्वयंपाक केला म्हणून बाटल्याची तक्रार करणाऱ्या मेधा खोलेंच्या , धड पाठीशीही हे दोघे राहिले नाहीत , आणि धड त्यांचा निषेध ही केला नाही.. अशी रुखरुख अनेकांच्या मनात घर करून आहे. खरे तर काही संघटना ,पक्ष यांनी याप्रकरणी खोलेंचा आणि त्यांची अशी अभूतपूर्व तक्रार नोंदवून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध केला ,निदर्शने केली .त्यानंतर खोलेताई यांनी तक्रार मागे ही घेतली . पण ब्राम्हण नसलेल्या इतर लोकांमुळे अजूनही बाटाबाटी चे प्रकार पुण्यात चालत आहेत ,हे त्यांच्या या कृतीमुळे उघड आणि जाहीरपणे दाखवून दिले. आणि विशिष्ट लोक विशिष्ट लोकांनाच नौकरी, काम धंदा देत आहेत ,गुणवत्ता तिथे फिकी पडते आहे, याची चर्चा या प्रकारामुळे प्रकर्षाने चव्हाटया वर मांडली गेली .
खोले ताई यांनी पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात जी फिर्याद दाखल केली, त्यात आपला सोवळ्यातला स्वयंपाक बाटल्याची तक्रार करताना, स्वयंपाक बाटण्याचे कारण असे दिले आहे की, तो स्वयंपाक एका यादवकुलीन मराठा निर्मला यादव या महिलेने केला होता. यांच्या स्पर्शाने आपला ब्राम्हण धर्म बाटतो, हेच आजमितीला दाखवून दिले. या तक्रारीने पुरोगामी महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घातले गेले . पण जोमाने पुढे सरसावली ती मराठा कार्डाचे राजकारण करणारी मंडळी . ओबीसी ,दलित,रिपब्लिकन,बहुजन अशा विविध जातीजमातीच्या आणि सर्वधर्म समभाव माननाऱ्या संघटना त्या जोमाने सरसावल्या नाहीत.पुण्यात पेशवाई आहे कि मराठेशाही आहे अशा स्वरूपाचा वाद कोणी पेटवू नये .पण इथे मानवतेचा कारभार ,माणुसकीचा दरबार आहे, असे दिसतच नसल्याने बहुधा मानवतावादी संघटनाही पुढे आल्या नसाव्यात .आणि नेमकी पुण्यात हीच उणीव मोठी आहे . त्यामुळे पुणे तिथे काय उणे असे आता कोणी म्हणू नये .
हे विश्वची माझे घर, अशी शिकवण देऊन जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर,यांची करून कहाणी सर्वांना ठाऊक आहे .शिर्डीच्या साईबाबांचे खडतर जीवनमान देखील सर्व जाणून आहेत .पण त्यांच्या नंतरदेखील त्यांच्याच नावाचा वापर करून फायदे लाटणारी मंडळी , ही, तीच आहेत यात शंका कोणी घेण्याचे कारणनाही . फरक एवढाच आहे,त्यांच्या काळात ही समाज प्रवृत्ती उघडपणे ,निर्भीड छातीने पुढे येवून बाटल्याची वागणूक देत होता, आणि आता …. छुपे रुस्तुमगिरी सुरु असावी, असे वाटल्याशिवाय राहणार नाही अशा परिस्थितीत खोले ताई यांनी दाखविलेले धाडस निश्चितच वास्तवता अधोरेखित करणारे आहे .
मनुस्मृतिने शिक्षण नाकारलेल्या स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवणारे महात्मा जोतिबा फुले-सावित्रीमाई फुले पुढे आल्या, तेव्हा त्यांना याच शहरात दगडे फेकून मारली गेली .ज्यांनी दगडी मारली… आता त्यांच्या वारसदार मुली .. कुठे पायलट ,कुठे संशोधक , कुठे अध्यापक ,तर कुठे आमदार ,खासदार ,नगरसेवक ,सरपंच असतील .आणि खोले ताई देखील त्यामुळेच हवामान खात्याच्या संचालिका पदांवर पोहोचल्या .
ज्या महात्मा फुल्यांना याच शहरात पालिकेच्या निवडणुकीत पराभूत करण्यात आले होते त्यांचाच पुढे पुतळा लावून पालिकेचा कारभार सुरु ठेवला गेला . याच महापालिकेतील महापौर पदावर विराजमान असलेल्या लोकमान्य टिळकांचा वारसा सांगणाऱ्या मुक्ताताई यांनी, मेधा खोले यांच्या बाबत कोणतीही भूमिका उघड करू नये , हा प्रश्न अनेकांची मने विचलित करून जात आहे .बडे बडे शहरोंमे ,छोटी छोटी बाते होती रहती है, आप ध्यान ना दिजीये ,हम समर्थ है , अशा स्वरूपाचे स्पष्टीकरण शनवार वाड्यावरून सीएम फडणवीसांपुढे करणाऱ्या पालकमंत्र्यांना देखील या घटनेत स्वारस्य दाखविण्याची गरज भासलेली दिसत नाही .स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेवर आधारित संविधान बहाल केलेले डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या, या थोर महापुरुषांच्या प्रतिमा ,पुतळे उभारून त्यांना आदरांजली वाहणाऱ्या राजकारण्यांनी याबाबत ठोस भूमिका जाहीर करायलाच हवी होती, ती का केली नाही असा प्रश्नात्मक मतप्रवाह सध्या आहे.