- महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार
पुणे | प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मयूर कॉलनी ते पौड फाटा यांना जोडणारा डी.पी. रस्ता हा लवकरच कोथरूडकरांसाठी खुला होणार आहे. यामुळे कर्वे रस्ता आणि पौड रस्ता यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मयुर कॉलनी ते पौड फाटा या डीपी रस्त्याची पाहणी महापौर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त आणि विविध विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांसोबत करुन आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, एसआरए मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, स्थानिक नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, पथविभाग प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, अनिरुद्ध पावसकर, महापालिका सहआयुक्त संदीप कदम व इतर अधिकारी उपस्थित होते.
अत्यंत महत्वाचा असलेला हा रस्ता गेली अनेक वर्ष या रस्त्यामधील असलेल्या भीमनगर मधील घरामुळे तो पूर्ण होवू शकत नव्हता. या घरांचा प्रश्न आता मार्गी लागला असून डीपी रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे सातत्याने यासाठी प्रयत्न सुरु होते. या रस्त्यात बाधित होणाऱ्या घरांना बीएसयूपी आणि आर सेव्हनच्या माध्यमातून घर देण्याचे नुकतेच काम पूर्ण झाले. ही घरे राहण्यासाठी नागरिकांना ताब्यातही देण्यात आली आहेत. पूर्वीची रस्तावर असलेली घरे पाडण्याचे काम सुरू होत आहे.’
‘रस्ता लवकरात लवकर खुला करण्यासाठी महापालिका आणि एसआरएच्या माध्यमातून नियोजन करण्यासाठी जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन सर्व संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. रस्त्यामध्ये असलेली काही घरे असून ती घरे एसआरएच्या माध्यमातून हस्तांतरित केली जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे झालेल्या कामाचे समाधान यामुळे मिळेल. तसेच कोथरूडकरांना वाहतुकीच्या दृष्टीकोनातून चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे त्याचेही समाधान आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

