पुणे :महापौर मुरलीधर मोहोळ हे पावसाळा सुरू झाल्यानंतर नालेसफाईची पाहणी करण्यासाठी जागे झाले असून, आता त्यांची पळापळ सुरू झाली आहे. असा आरोप करत आणि त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवून व घोषणा देऊन सोमवारी निषेध करण्यात आला.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी महापौर असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी म्हटले आहे कि,’ पावसाळ्याचा सामना करण्यासाठी शहर सज्ज असावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून आजपर्यंत शहरातील नालेसफाईचा एप्रिल – मे महिन्याच्या मध्यावर आढावा घेतला जात होता. मात्र, विद्यमान महापौरांना पावसाळा सुरू झाल्यानंतर १४ जून रोजी नालेसफाईची पाहणी करण्यास वेळ मिळाला. शहरातील रस्त्यांची कामे असोत वा नालेसफाईची कामे असोत, सत्ताधारी भाजपकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे पुणेकरांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे, आज नालेसफाईची पाहणी करणारे महापौर व त्यांच्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोथरूड, कसबा पेठ, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार विधानसभा मतदारसंघांत सात ठिकाणी काळे झेंडे दाखवून व घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

