पुणे-बिबवेवाडी येथील पी एम टी कॉलनी मध्ये असलेले त्रिमूर्ती डेकोरेटर्सच्या मांडव गोदामाला दुपारी २.४५ मिनिटांनी भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
आगीची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या होत्या . बिबवेवाडी बकुळ नगर देवकी बंगला मागे बुधवारी( दि. ३) दुपारी बिबवेवाडी येथे मांडव गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळविली. यानंतर घटनास्थळी आगीचे मोठ्या प्रमाणात लोळ पसरल्यामुळे शेजारच्या इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उष्णतेमुळे या इमारतीला तडेही गेले असल्याची माहिती मिळत आहे. हे मांडवाचे गोदाम दाट रहिवासी वस्तीमध्ये असून त्यालगत असलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

