मराठी साहित्यविश्वाला आपल्या लेखणीने समृद्ध करणारे लेखक, कवी म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज. आपल्या कथा कविता, कादंब-या, नाटकं आणि ललित साहित्यामधून त्यांनी मराठी भाषेचं समृद्ध दालन जगभरातील वाचकांसाठी खुलं केलं. मराठीची महिती जनसामन्यांपर्यंत पोहचावी म्हणून ते सतत प्रयत्नशील होते. प्रसंगी मराठीबाबत उदासिन असलेल्या व्यवस्थेवर त्यांनी ताशेरेही ओढले. मराठी भाषेसाठी त्यांनी केलेल्या या कार्याचाच गौरव म्हणून दरवर्षी २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिनाचे औचित्य साधत येत्या २८ फेब्रुवारीला झी मराठी वाहिनीवर त्यांचा जीवनप्रवास सांगणारा प्रवासी पक्षी हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. रविवारी दुपारी १ वा. ‘कुसुमाग्रज अभिवादन’ या कार्यक्रमात प्रसारित होणा-या या लघुपटात कुसुमाग्रजांच्या जीवनातील विविध टप्पे त्यांच्याच मुलाखतीतून उलगडले जाणार आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.
नव्वदच्या दशकात डॉ. पटेल यांनी हा लघुपट बनवला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेला हा लघुपट म्हणजे कुसुमाग्रजांच्या चाहत्यांसाठी खास पर्वणी असणार आहे. या लघुपटात डॉ. पटेल आणि ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून कुसुमाग्रजांचा जीवनप्रवास आणि कवितांचा प्रवास उलगडला गेला आहे. कुसुमाग्रजांचे शेक्सपिअरवर नितांत प्रेम होते. शेक्सपिअरच्या नाटकातील स्वगते हा काव्याचाच एक प्रकार आहे असं ते मानत. शेक्सपिअरच्या साहित्याबद्दलचे त्यांचे विचार आणि त्यातून तयार झालेली काही नाटके याबद्दलची रंजक माहिती यातून बघायला मिळेल. याशिवाय ‘ऑथेल्लो’ नाटकातील नाना पाटेकर आणि पूजा पवार यांचा एक प्रसंग, ‘कौंतेय’ नाटकातील विक्रम गोखले आणि रिमा यांचा एक प्रसंग, ‘वीज म्हणाली धरतीला’ नाटकातील सुधा करमरकर आणि फैय्याज आणि सादर केलेला रोमहर्षक प्रसंग यातून बघायला मिळतील. यासोबतच ‘नटसम्राट’ या अजरामर नाटकातील डॉ. श्रीराम लागूंनी सादर केलेली काही स्वगतेही प्रेक्षकांना बघायला मिळतील. कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांमध्ये लोकप्रिय असलेल्या कविता म्हणजे ‘कणा’ आणि ‘अखेरची कमाई’. यापैकी ‘कणा’ ही कविता खुद्द कुसुमाग्रजांकडून तर अखेरची कमाईचं हिंदी अनुवादित रूप प्रख्यात गीतकार गुलझार यांच्याकडून ऐकण्याची संधीही या लघुपटातून मिळेल. याशिवाय साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याचे क्षणचित्रे, कुसुमाग्रजांची भाषणे, ना. धों. महानोर, सोनाली कुलकर्णी, पांडुरंग घोटकर, रविंद्र साठे यांनी सादर केलेल्या त्यांच्या कविता अशा ब-याच गोष्टींची पर्वणी या लघुपटाद्वारे प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे.
‘प्रवासी पक्षी’ या लघुपटासोबतच ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमातील कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित असलेल्या एका भागाचं संकलित रूपही यात बघायला मिळणार आहे. एकंदरीतच येत्या रविवारी २८ फेब्रुवारीला सादर होणारा ‘कुसुमाग्रज अभिवादन’ हा कार्यक्रम म्हणजे मराठी भाषेच्या आणि कुसुमाग्रजांच्या चाहत्यांसाठी मराठी भाषा दिनाची आगळी वेगळी मेजवानी ठरणार आहे.