“मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी व्यावसायिकांचा सन्मान
पुणेः मराठी भाषिक माणसाच्या महत्वाकांक्षा नेहमी छोट्या असतात, असे मानले जाते. आपली ही गरीबीची मानसिकता प्रथम बाजूला केली पाहिजे. सचोटी, हातोटी आणि कसोटी या तीन गुणांच्या बळावर मराठी उद्योजकांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर ते काम केवळ साहित्यिकांचे नाही तर उद्योजकांचे देखील आहे. म्हणून मराठी भाषा ही उद्योगाची भाषा झाली पाहिजे. मराठी भाषिक उद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढावी, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ व तुळशीबाग व्यापारी असोसिएशनच्या वतीने “मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. लक्ष्मी रस्त्यावरील मे. श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सच्यादालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन पुणेचे अध्यक्ष, नंदू घाटे, नगसेवक राजेश येनपुरे, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विश्वस्त विवेक खटावकर, नितिन पंडित, मोहन साखरीया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गोरे आणि मंडळीचे डॉ. धनंजय गोरे, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, कावरे आईस्क्रीमचे दत्तात्रय कावरे, प्रकाश मसालेचे बाबासाहेब जाधव, गिरे भेळचे गणेश गिरे, काकडे अॅन्ड सन्सचे नितीन काकडे, अक्षय हॉटेलचे अशोक वझे, नगरकर सराफचे पुष्कर नगरकर यांचा सन्मान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, शाल, फळांची परडी, मोत्याची माळ असे सन्मानाचे स्वरूप होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील आठ-दहा वर्षापूर्वी गणेशोत्सव मंडळ म्हणजे फक्त उत्सवात मोठे स्पिकर लावणे, आपल्या संस्कृती परंपरला फाटा देत वेगळ्या प्रकारे उत्सव साजरा करणे अशी प्रतिमा सामान्य माणसाच्या मनात होती. परंतु ते चित्र बदलले असून अलिकडच्या काळात सामाजिक उपक्रम राबवून ती प्रतिमा बदलण्याचे काम पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांनी केले, असे ही त्यांनी सांगितले.
विद्याधर अनास्कर म्हणाले, संपूर्ण अर्थव्यस्थेचा महत्वाचा घटक म्हणून व्यापा-यांकडे पाहिले जाते. व्यापारी हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. आपल्या भावना मनापासून दुस-या पर्यंत पोहचविण्याचे माध्यम म्हणजे बोली भाषा असेत. आपली मराठी बोली भाषा जपण्याचे काम व्यापारी देखील करतात, असेही त्यांनी सांगितले. काही मराठी व्यापा-यांनी देखील मनोगत व्यक्त केले. रामदास तुळशीबागवाले, विनायक कदम, किरण चौहान, दुर्गेश नवले, राजू साखरीया, राजेश शिंदे, किरण भंडारी, कुशल पारेख, राहुल खोडके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

