विजय पाटकर यांना मनसे चित्रपट सेनेचा सवाल …
पुणे- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयात झालेला ४ लाख २२ हजार ५५५ रुपयांचा घोटाळा का दडविला ? असा सवाल मनसे चित्रपट सेनेचे पुणे शहर अध्यक्ष कुणाल निंबाळकर यांनी महामंडळाचे मावळते अध्यक्ष विजय पाटकर आणि संचालकांना केला आहे .या संदर्भात पुढील कारवाईची दिशा आमचे वरिष्ठ नेते अमेय खोपकर यांच्याशी बोलून आपण ठरविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
निंबाळकर यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , एप्रिल ते जून २०१५ याकाळात … म्हणजे पाटकर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच महामंडळाच्या पुणे कार्यालयात ४ लाख २२ हजार ५५५ रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका महामंडळाच्या ऑडिट मध्ये ठेवण्यात आला आहे . महामंडळाच्या वार्षिक अहवालात पान २९ वर याची नोंद आहे . सभासदांच्या पैशाचा गैर विनियोग आणि अपहार झाल्याचे त्यात स्पष्ट नमूद आहे . हा पैसा कोणी कशासाठी वापरला ? महामंडळाच्या पुणे कार्यालयात या काळात जमा झालेली रक्कम परस्पर कोणी कोणाच्या पाठिंब्याने वापरली? महामंडळाच्या निवडणुका लढविण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या तथाकथितांनी या पैशाचा हिशेब का नाही मागितला ? असे सवाल त्यांनी केले आहेत
अध्यक्ष आणि संचालकांची मुदत संपल्यावर यापैकी कोणालाच महामंडळाचे पैसे खर्च करता येणार नाहीत . मुदत संपण्यापूर्वीच या सर्वांनी चोख हिशेब सादर करायला हवा होता . आणि आता मुदत संपल्यावर घोटाळे दाखविणारा वार्षिक अहवाल सादर करून ; अजब पद्धतीने हे संचालक स्वतःला मुदतवाढ मागत असल्याचे निंबाळकर यांचे म्हणणे आहे .