मुंबई, दि. २३ एप्रिल – राज्यात करोनाने थैमान मांडले असताना कोविड रुग्णालयात आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. २०२१ च्या जानेवारी महिन्यात भंडारा जिल्हा रुग्णालयाला आग लागली, त्यात १० नवजात बाळांचा मृत्यू झाला, मार्च महिन्यात भांडुपच्या सनराईज रुग्णालयाला आग लागली, त्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला, एप्रिल महिन्यातच नागपूरच्या वाडी भागातील कोविड रुग्णालयाला आग लागली आणि ३ रुग्णांचा मृत्यू झाला, २० एप्रिलला नाशिक येथील कोविड रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन तब्बल २३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आणि काल विरार येथील एका खाजगी कोविड रुग्णालयाला भीषण आग लागून त्यात १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर काही रुग्णांची प्रकृती अजूनही गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एकामागोमाग घडणाऱ्या या घटनांमुळे विरोधक संतप्त झाले असून त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
काल नाशिक येथे झालेल्या दुर्घटनेत २५ निष्पापांचा बळी गेला, आज विरार येथील आगीत ११ बळी गेले, यापूर्वीही अशाच घटना घडल्या असून अनेकांना जीव गमवावा लागला, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय का, असा सवाल उपस्थित करून महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असून पूर्णपणे सरकार या अव्यवस्थेला जबाबदार आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
विरार पश्चिमेकडील विजय वल्लभ नावाच्या कोविड रुग्णालयाला आज पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान आग लागली. या रुग्णालयातील मुख्यतः आयसीयु विभाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्यात १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. रुग्णालयातील ही आग वातानुकूलन यंत्रात झालेल्या स्फोटामुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आज सकाळी दरेकर यांनी विरार येथे जाऊन घटनास्थळाची पहाणी केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
दरेकर म्हणाले की, शॉर्टसर्किट होणार नाही, आग लागणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. भंडारा, भांडूप , नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, कालच नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. त्यामुळे करोनापेक्षा “सरकारी मुर्दाडपणामुळे” अनेक निष्पापांना जीव गमवावा लागत आहे.
विरारच्या घटनेबाबत बोलताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी “ही काही नॅशनल न्यूज नाही”, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर समाज माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता दरेकर म्हणाले की, राजेश टोपे यांचे विधान बेजबाबदारपणाचेच नाही तर संतापजनक आहे. याना जनतेचे आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल, असा संतप्त सवालही दरेकर यांनी विचारला. राज्यातील आघाडी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या संवेदना मेल्या असून ते बेताल बडबड करत आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याऐवजी, जनतेच्या दुःखावर मीठ चोळणारी वक्तव्य ते करीत आहेत.
दरेकर यांनी या सर्व घटनांना सरकारला जबाबदार धरले असून ते म्हणाले की, करोना काळात यंत्रणेवर ताण आहे, हे मान्यच करावे लागेल. परंतु, व्यवस्थेत कमतरता आहे, हे मान्य करायला सरकार तयार नाही. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक आगीच्या घटना घडून सुद्धा हे सरकार जागे व्हायला तयार नाही, हा सरकारचा निष्काळजीपणा असून फक्त खुर्च्या उबवण्यासाठी हे सत्तेवर आहेत. आगीच्या घटना घडल्यानंतर मंत्री किंवा पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्यात गेले असते, त्यांनी यंत्रणांकडून आग प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला असता तर किमान काही घटना आणि अनेक मृत्यू टाळता आले असते. त्याऐवजी घटना घडल्यानंतर केवळ फायर ऑडिटचा आदेश देण्यापालिकडे आणि कमिट्या, चौकशा नेमण्यापालिकडे हे सरकार काही करताना दिसत नाही. त्यामुळेच या घटनांना सरकारच जबाबदार आहे.

