पुणे : ‘किर्लोस्कर सिस्टीम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक आणि सध्या ‘टोयोटा किर्लोस्कर मोटर्स’मध्ये लेक्सस प्रकल्पावर पूर्ण वेळ काम करत असलेल्या मानसी किर्लोस्कर यांनी नुकताच ‘यंग इंडियन्स (वायआय) स्पीकर सेशन’ या सत्रात युवा पिढीशी संवाद साधला. येथील हॉटेल क्राऊन प्लाझा येथे झालेल्या या सत्रात त्या बीजभाषण वक्त्या म्हणून बोलत होत्या. ‘यंग इंडियन्स’ हा ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’चा (सीआयआय) भाग आहे. मानसी किर्लोस्कर यांनी आपल्या प्रभावी भाषणाने १०० यंग इंडियन्स सदस्यांना मंत्रमुग्ध केले. मानसी आपल्या कामाचा समतोल कसा साधतात, ‘केअरिंग विथ कलर’ हा त्यांचा सामाजिक उपक्रम, चित्रकार, खोल समुद्रातील पाणबुड्या, गिर्यारोहक व अन्य छंदांप्रतीची त्यांची आकांक्षा आणि यातील प्रत्येक कृती व्यवसाय दृष्टीकोनातून त्यांना कशी साह्यभूत ठरते हे ऐकताना श्रोतृवृंद भारावून गेला.
मानसी किर्लोस्कर म्हणाल्या, “ मला सर्वांत महत्त्वाचे शिक्षण कलेतून मिळाले आणि त्यानेच मला विचार कसा करावा, हे शिकवले. मी चतुरस्त्र विचार करायला, अपयश स्वीकारायला, खुल्या मनाची आणि करुणाशील बनायला शिकले. स्कुबा डायव्हिंगमुळे मी संकटाच्या काळात शांत आणि सहनशील राहून परिस्थिती योग्य हाताळायला शिकले. गिर्यारोहणाने मला कधीही हार न मानण्यास विशेषतः तुम्ही नवउद्योगाचा भाग असताना प्रयत्न सोडून न देण्याबाबत शिकवले. याच छंदाने मला सांघिक काम आणि जुळवून घेण्यासही शिकवले.”
आपल्या ‘केअरिंग विथ कलर’ या आवडीच्या प्रकल्पाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “मला वयाच्या १४ व्या वर्षापासूनच सामाजिक परिणाम घडवणारा नवउद्योग स्थापन करण्याची इच्छा होती. वयाच्या १५ व्या वर्षी मी सरकारी शाळांत शिकवण्यास सुरवात केली. अखेर यंदा मी माझा स्वतःचा ‘केअरिंग विथ कलर- ए मानसी किर्लोस्कर इनिशिएटिव्ह’ हा सामाजिक परिणाम घडवणारा पुढाकार सुरु केला. गरीब आणि वंचित मुलांच्या भावनात्मक विकासात कला आणि रंगांचा परिणाम दाखवून देणारे संशोधन झाले आहे. हा पुढाकार सरकारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांवर भर देणारा आहे. आपण देत असलेल्या शिक्षणाचा मार्ग बदलणे आणि त्याला अनुभव व शोधाची प्रक्रिया बनवणे, ही या पुढाकारामागील कल्पना आहे. कौशल्याला अभ्यासक्रमापासून विलग करण्यावर आम्ही भर देतो.”
मानसी किर्लोस्करांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र झाले. ‘यंग इंडियन्स’चे सदस्य आदित्य काळे आणि ध्रुव आगरवाल यांनी मानसी यांना अनेक रंजक प्रश्न विचारले आणि मानसी यांनीही त्यांची समर्पक उत्तरे दिली.
मानसी या उद्योग महर्षी शंतनुराव किर्लोस्कर यांच्या खापर पणती आहेत. भारतातील जुन्या आणि अत्यंत आदरणीय उद्योजक घराण्यांपैकी असलेल्या किर्लोस्करांच्या पाचव्या पिढीतील असलेल्या मानसी आज नव्या पिढीच्या बिझनेस आयकॉन व उभरत्या यूथ आयकॉन म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
मानसी या उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांच्या विशाल उद्योग समूहाच्या एकमेव वारस आहेत. त्या आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करतातच, परंतु त्यांनी स्वतःचेही रिअल इस्टेट व वित्तीय सेवा क्षेत्रातील स्वतंत्र व्यवसाय सुरु करुन उद्योजकतेचे कौशल्य दाखवून दिले आहे.
या संवादसत्राच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या पुण्याच्या प्रसिद्ध कलावंत माधुरी भादुरी होत्या. कला ही उत्तम गुंतवणूक कशी ठरु शकते, यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

