नेहा मुथियान प्रस्तुत कथक रचनांच्या ‘नृत्यार्पण’ कार्यक्रमास चांगला प्रतिसाद
पुणे :
‘नर्तकाची नृत्यावर, गुरुजनांवर, वडिलधार्यांवर नितांत श्रद्धा असणे आवश्यक आहे. मात्र, त्यापेक्षाही जास्त त्याची स्वत:वर, साधनेवर श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी. या निष्ठेमुळेच योग्य दिशेने मार्गक्रमण होऊ शकते’, असे मत ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे यांनी मांडले.
शांभवी दांडेकर यांच्या ज्येष्ठ शिष्या नेहा मुथियान यांच्या ‘नृत्यार्पण’ या कथक रचनांचा बहारदार आविष्कार कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमात नेहा मुथियान यांनी धृपद, चौताल, जटायूमोक्ष आणि कृष्णवंदना सादर केली. या वेळी ‘लाऊड अप्लॉज’ या नृत्याला वाहिलेल्या द्वैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी नीलिमा हर्डीकर, आशा मुथियान उपस्थित होत्या.
नेहा मुथियान म्हणाल्या, ‘घरच्यांचा पाठिंबा, प्रोत्साहन यामुळे मी समर्थपणे नृत्याची साधना करीत आहे.’ नेहाची विद्यार्थिनी निकिता अष्टपुत्रे हिने मनोगत व्यक्त केले. गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले.
‘नृत्यार्पण’ या कार्यक्रमादरम्यान नेहा मुथियान यांनी विविध सांगितिक रचना सादर केल्या.
आरती प्रभू यांची ‘गाडा’ ही कविता कथकच्या माध्यामातून अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आली. ‘कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर’ या ओळींमधून नेहा मुथियान आणि जान्हवी पाठक या दोघींनी जीवनाचे गूढ कथकच्या माध्यमातून अत्यंत समर्पकतेने सादर केले. या सादरीकरणाने ‘नृत्यार्पण’ वेगळ्या उंचीवर जाऊन ठेपले. त्यानंतर कथक पाठशालेच्या विद्यार्थिनींनी मुद्राभाव, ठेका, लहरा यांचा प्रभावी वापर करत नृत्य मैफल सजवली.
मंगेश करमरकर (तबला), राजीव तांबे (संवादिनी), अश्विनी गोखले, आदित्य बिडकर (गायन), रोहित वनकर (बासरी), निखिल महामुनी (सिंथेसायझर). वल्लरी आपटे (पढंत) यांनी सुरेख साथसंगत केली.


