पुणे :
‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालया’चे ‘माई मंगेशकर कार्डियाक सेंटर’च्या वतीने जागतिक हृदयदिनानिमित्त ‘मिनी वॉकेथॉन’ चे आयोजन करण्यात आले होते . पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (वाहतूक विभाग) यांनी शनिवारवाडा येथे सकाळी साडे सहा वाजता हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले.
‘वॉकेथॉन’चा मार्ग शनिवारवाडा ते दीनानाथ मंगेशकर रूग्णालय असा 4.8 किलोमीटरचा होता. या वॉकेथॉनचे आयोजन प्रामुख्याने अँजिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी केले होते. या वॉकेथॉनमध्ये हृदय शस्त्रक्रिया झालेल्या 200 रुग्णांनी भाग घेतला. कोणत्याही अडचणीशिवाय स्पर्धा पूर्ण केली.
’मिनी वॉकेथॉन ’ चे विजेते सुनीलकुमार देशमुख (प्रथम क्रमांक), योगेश चव्हाण (द्वीतीय ),शेखर जोशी (तृतीय ) यांना अभय फिरोदिया, डॉ धनंजय केळकर, डॉ. शिरीष साठे, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले. सूर्यकांत लेले, गणेश थत्ते, मनोहर जोशी आणि श्री. बक्षी यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. ’घेई उंच भरारी’ या चंद्रशेखर जोशी लिखित पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांनी केले . हृदयशस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचे अनुभवांचा या पुस्तकात समावेश आहे .
‘तणाव मुक्त आणि आनंदी जगावे, चांगल्या सवयी ठेवाव्यात आणि ठराविक कालावधीनंतर सुट्टी घ्यावी, स्वतः आनंदी राहून आपल्या हृदयालाही आनंदी ठेवावे’असा सल्ला ‘फोर्स मोटर्स’चे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी या वेळी बोलताना दिला .ते म्हणाले ,’ मिनी वॉकेथॉन’ या उपक्रमामुळे रुग्णांना चालण्याचा आत्मविश्वास मिळाला आणि शारीरिक क्षमताही कळली . हृदय रोगाबद्दल जनजागृती करण्याचा आणि हृदय रोग झालेल्या रुग्णांचे मनोबल उंचविण्याचा हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण आहे.’
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर म्हणाले, ‘हृदय शस्त्र क्रिया ही निरोगी आयुष्य जगण्याची दुसरी संधी असते. आयुष्यात आपण कारकीर्द ,पैसे , समाजसेवा अशा अनेक गोष्टींना प्राथमिकता देतो. मात्र, आपल्या शरीरालाही जपण्याची प्राथमिकता असली पाहिजे. हृदय शस्त्रक्रिया झाल्याने आयुष्य थांबत नाही , ते पुन्हा नव्याने सुरु होते. हृदय शस्त्रक्रिया झालेले रुग्ण एव्हरेस्ट शिखर ही सर करतात.’
प्रास्ताविकात ‘माई मंगेशकर कार्डियाक सेंटर’ चे विभाग प्रमुख डॉ . शिरीष साठे यांनी उपक्रमाची माहिती दिली . ते म्हणाले ,‘वर्ल्ड हार्ट फेडरेशन’ ने ’लव्ह युवर हार्ट ,पॉवर युवर लाईफ ’ अशी या वर्षीच्या जागतिक हृदयदिनासाठी संकल्पना आणि बोध वाक्य दिले आहे.जागतिक हृदयदिनानिमित्त’ हृदयरोगाबाबत जनजागृती करणे हा या ‘वॉकेथॉन’चा प्रमुख हेतू होता. तंबाखु सेवन, अतिमद्यपान, व्यायामाचा अभाव, आहाराचा अनियमितपणा या गोष्टी टाळल्या तर 85 % लोकांमध्ये हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण टाळता येऊ शकते. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता .
‘माई मंगेशकर कार्डियाक सेंटर’ चे विभाग प्रमुख डॉ.शिरीष साठे आणि वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. सतेज जानोरकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, हृदय ज्योत परिवाराच्या ज्योती मुंगसे, डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे, डॉ. आसावरी पागे उपस्थित होते. अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले.
वॉकेथॉननंतर पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले अनेक रुग्णांनी मनोगत व्यक्त केले .
सकाळी 6.15 वाजता शनिवारवाडा येथून वॉकेथॉनला सुरूवात होऊन सकाळी 7.30 वाजेपर्यंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे समाप्त झाला. शनिवारवाडा ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे अंतर 4. 8 कि .मी. इतके आहे.
वॉकेथॉननंतर सकाळी 8 ते 9 या वेळात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा मुख्य कार्यक्रम ‘दीनानाथ मंगेशकर रूग्णालय’, मेन बिल्डिंग, सौद बाहवान सभागृह, आठवा मजला येथे झाला .

