५० टक्के सवलतीत रात्री ८ ते सकाळी ८ वेळेत एम आर आय सेवा देणार :डॉ . धनंजय केळकर
पुणे :
‘दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल च्या रूपाने मंगेशकर कुटुंबीयांनी दिलेले सामाजिक योगदान एक दीपस्तंभ असून भूषणावह आहे ‘ असे सांगत , ‘आरोग्यसेवेचा परीघ बदलत असताना आधुनिक तंत्राच्या साहाय्याने वैद्यकीय सेवा सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे ‘ ,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केले .
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या अत्याधुनिक ३- टी एम आर आय युनिट चे उदघाटन गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे प्रमुख विश्वस्त पंडित हृदयनाथ मंगेशकर होते .
व्व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट ,हॉस्पिटल चे वैद्यकीय संचालक डॉ . धनंजय केळकर ,आदिनाथ मंगेशकर उपस्थित होते .
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय सेवेतील सद्य स्थितीचा परखड आढावा घेत राज्य सरकारच्या कल्याणकारी पावलांची माहिती दिली . मुख्यमंत्री म्हणाले ,’धर्मादाय तत्वावर चालणारी रुग्णालये प्रत्यक्षात खूप पैसा बाळगून असतात ,८० टक्के खर्च रुग्णांवर झाल्याचे दाखवत होते ,मात्र आम्ही हा व्यवहार पारदर्शी केला . त्यातून गरिबांना मोफत वैद्यकीय सेवा मिळू लागली .२०० कोटीहून अधिक अधिक रकमेचा फायदा गरीब रुग्णांना देता आला ‘ .
मुख्यमंत्री कार्यालयात वैद्यकीय सेवेसाठी मदत कक्ष सुरु केल्यावर त्या माध्यमातून ९,८०० रुग्णांना मदत दिली गेली . टेली मेडिसिन योजना ,मेळघाट मधील कुपोषण कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न ,रिअल टाइम तत्वावर वैद्यकीय सल्ला देण्यासाठी केलेले तंत्रज्ञानाचे करार ,असे दाखले देत त्यांनी राज्य सरकार गोर गरिबांच्या वैद्यकीय मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले . राज्यात जेंडर रेशो वाढला आहे ,बाल मृत्यू दर कमी झाला आहे याचाही उल्लेख त्यांनी केला .
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे काम भूषणावह असून चांगल्या लोकांच्या पाठीशी आम्ही उभे राहू ‘अशी ग्वाही त्यांनी दिली .
प्रास्ताविक करताना डॉ. धनंजय केळकर यांनी मंगेशकर हॉस्पिटल मधील अत्याधुनिक सेवेची माहिती देत २९ कोटीहून अधिक रकमेचे वैद्यकीय उपचार गरिबांवर केले असल्याचे सांगितले . इतर रुग्णालयांच्या एकूण चॅरिटी पेक्षा ही रक्कम अधिक आहे ,असेही त्यांनी सांगितले . ५० टक्के सवलतीत रात्री ८ ते सकाळी ८ वेळेत एम आर आय सेवा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली . मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रक्रियेतील साखळी नाहीशी व्हावी ,लिंगनिदान होऊ नये ,भेदभाव मुक्त आरोग्य सेवा डोक्यात असावी असे सांगत राज्य शासन आणि संस्थांनी एकत्र येऊन चांगली रुग्णसेवा उभारावी असे आवाहन त्यांनी केले .
पालकमंत्री गिरीश बापट यांनी दीनानाथ हॉस्पिटलच्या टीम वर्क चे कौतुक केले .ते म्हणाले ,’ ‘दीनानाथ हॉस्पिटल सारखे चॅरिटीचे काम सर्व हॉस्पिटलनी केले तर कायद्याचा बडगा दाखवावा लागणार नाही ‘
आदिनाथ मंगेशकर यांनी आभार मानले .
कार्यक्रमाला समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे ,खासदार अनिल शिरोळे ,भारती मंगेशकर ,अभय फिरोदिया ,डॉ गिरीश बापट ( ज्ञान प्रबोधिनी संचालक ),डॉ . संदीप बुटाला उपस्थित होते

