– पहिला ‘अंतर्नाद पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना प्रदान
पुणे– तबलजींना फार जास्त बोलता येत नाही, त्यांचे बोलणे, व्यक्त होणे म्हणजे तबल्यातुनच होत असते. संगीतामध्ये जशी लय महत्वाची असते त्याच प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात लय फार महत्वाची असते आणि ही लय राजू जावळकर यांनी आयुष्यभर सांभाळली असे मत ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांनी व्यक्त केले.
अंतर्नाद संस्थेच्यावतीने यंदाचा पहिला ‘अंतर्नाद पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक राजू जावळकर यांना ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी अंर्तनादचे अमित गोखले, शेखर गोखले, निलेश परब, कृष्णा मुसळे, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना राजू जावळकर म्हणाले, हा पुरस्कार माझे गुरु उस्ताद गुलाम रसूल खाँ साहेब यांचा आशीर्वाद आहे. हा माझ्या एकट्याचा सन्मान नाही तर मी ज्या कलाकारांना साथसंगत केली आहे अशा सर्वांचा आहे. या कलाकारांमुळे आणि माझ्या गुरूमुळे मी आज आपल्यासमोर आहे.
या पुरस्काराबद्दल माहिती देताना अमित गोखले म्हणाले की, संगीतावरील प्रेमातून आम्ही या संस्थेची स्थापना केली. संगीतप्रेमींना वैविध्यपूर्ण कार्यक्रम देणे हा आमचा हेतू आहे. आम्ही आजपर्यंत अनेक स्वयंसेवी संस्थांना मदत केली आहे. या वर्षी पासून आम्ही दरवर्षी एका गुणवंत कलावंतास पुरस्कार देण्याचे ठरवले, पहिला पुरस्कार राजू जावळकर यांना देताना आम्हाला आनंद होत आहे.
प्रास्ताविकपर भाषणात मिलिंद कुलकर्णी यांनी राजू जावळकर यांच्या आईचा अपघात झाला होता तरीही त्यांनी कार्यक्रम पूर्ण केल्याच्या घटनेला उजाळा देत, त्यांचे कलेप्रती असलेले समर्पण, निष्ठा याचा गौरव केला.