पुणे : वारूळवाडी, नारायणगाव (ता. जुन्नर) येथील आर.के. ड्रीप्स व मल्चिंग प्रॉडक्शन्स या नव्यानेच सुरु झालेल्या कारखान्यात 27,670 रुपयांची वीजचोरी महावितरणे उघडकीस आणली आहे. या प्रकरणी महावितरण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराच्या दक्षिणेस असलेल्या व वारुळवाडी येथील आर.के. ड्रीप्स व मल्चिंग प्रॉडक्शन्स हा कारखाना नुकताच सुरु झालेला आहे. या कारखान्यात वीजजोडणी घेतली नसतानाही वीजपुरवठा सुरु असल्याच्या संशयावरून महावितरणचे अभियंता व जनमित्रांनी या कारखान्यातील वीजयंत्रणा व उपकरणांची तपासणी केली. यात कारखान्यात वीजजोडणी दिल्याचे आढळून आले नाही. तसेच महावितरणच्या रोहित्राच्या लघुदाब फ्यूजपेटीमधून एका अनधिकृत भूमिगत केबलद्वारे या कारखान्यासाठी वीजचोरी होत असल्याचे निदर्शनात आले. या कारखान्यात 2060 युनिटची म्हणजे 27 हजार 670 रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वीच हा कारखाना सुरु झाल्याची माहिती कारखान्याच्या कर्मचार्यांनी दिली.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर, उपकार्यकारी अभियंता श्री. विवेक सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता श्री. सुरेश धापसे तसेच जनमित्र बबन पादीर, योगेश मोरे आदींनी ही वीजचोरी उघडकीस आणली.
या वीजचोरीप्रकरणी आर.के. ड्रीप्स व मल्चिंग प्रॉडक्शन्स कारखान्याचे संचालक किशोर ताराचंद भुसाळ, रुपेश रामदास दिघे यांच्याविरुद्ध शनिवारी (दि. 20) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.


