पुणे : बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि क्रीडामंत्र्यांच्या गाड्या बेदरकारपणे नेण्यात आल्या, क्रीडापटूंचा अवमान् करणारा हा प्रकार आहे. या बद्दल आघाडीच्या नेत्यांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
क्रीडा विद्यापीठाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे नेते आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शरद पवार, क्रीडामंत्री सुनिल केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे आणि अधिकारी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी लिफ्टचा अथवा तेथील पंधरा पायऱ्यांचा वापर न करता अॅथलेटिक्स ट्रॅकवरून गाड्या घेऊन गेले. ज्या ट्रॅकवर देशभरातील अॅथलेटस् सराव करतात, ऑलिंपिक वा आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होऊ पाहणारे धावपटू या ट्रॅकचा सरावासाठी वापर करतात, त्या ट्रॅकशी त्यांचे भावनिक नाते जोडलेले असते, अशा त्या ट्रॅकवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या गाड्या बेदरकारपणे नेण्यात आल्या. त्या प्रकाराने धावपटूंच्या भावनांचा चुराडा झाला. ही बेदरकार वृत्ती क्रिडापटूंचा अवमान करणारी आहे, असे आमदार शिरोळे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या क्रीडापटूंना प्रोत्साहन दिले. या पार्श्वभूमीवर श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात घडलेली घटना क्रीडापटूंचा अवमान करणारी आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि क्रिडामंत्र्यांनी खेळाडूंची बिनशर्त माफी मागायला हवी आणि या प्रकाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला क्रीडापटूंचा अवमान:बिनशर्त माफी मागा-आमदार शिरोळे
Date:

