मुंबई, दि १४ डिसेंबर – भाजपाला महाराष्ट्रातील जनतेचा जनाधार असल्याचे विदर्भातील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे आणि ठाकरे सरकारवर जनता पूर्णपणे नाराज असल्याचे चित्र या निकालाच्या माध्यमातून दिसून आल्याचे सिद्ध झाले आहे. जनतेने भाजपावर दाखविलेल्या विश्वा्साला आम्ही तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
नागपूर आणि अकोला विधान परिषद निवडणुकांत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर ते प्रसारमध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत झालेल्या निवडणुकांत भाजपा प्रथम क्रमांकावर होती. परंतु जनतेमध्ये हा संदेश गेलाय की सरकार चालवण्याच्या क्षमतेचे तिन्ही पक्षाची लोक नाहीत. सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय याचेसुद्धा प्रत्यंतर या निकालाच्या माध्यमातून दिसून येत आहे. विदर्भातल्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला आहेच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेता असतानाही महाराष्ट्रातील जनतेमध्ये जात आहेत व त्यांची यापूर्वीची पाच वर्षांची कारकीर्द होती ती कारकीर्द आणि आताची कारकीर्द यामधील तुलनात्मक विचारसुद्धा जनतेने केला आणि त्याचे पडसाद निकालातून उमटले आहेत, असेही दरेकर यांनी सांगितले.
दोन्ही जागांवरच्या विजयाने महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे की, महाराष्ट्रातील जनता आजही भाजपासोबत आहे. अकोल्याची शिवसेनेची गेली १५ वर्षे असणारी जागासुद्धा भाजपाने हिसकावून घेतली आहे. तिथल्या मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवून राज्याचा जनाधार भाजपाच्या बाजूने असल्याचे दाखवले. जनतेमध्ये असणारी नाराजी तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये सरकार चालवण्याची अकार्यक्षमता आणि त्याच्यामुळे ते अयशस्वी झाल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
…तर कॉंग्रेसने टयुशन लावावी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भाचे असूनही काँग्रेसच्या उमेदावाराची मते फुटली. कॉग्रेसला निवडणूक लढणे आणि राज्य सरकार चालवणे यातला फरक कदाचित कळत नसेल तर त्यांनी ट्युशन लावावी, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला.
प्रसारमध्यमांशी बोलताना दरेकर पुढे म्हणाले की, शिवसेना जागा जिंकू शकली नाही याचा अर्थ शिवसेनेचे काऊंटडाऊन सुरू आहे. तेथील लोकप्रतिनिधीनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वसंत खंडेलवाल यांना मतदान केले याचा अर्थ स्पष्ट आहे. राज्यातील जनता या सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे. त्याचे प्रतिबिंब या लोकप्रतिनिधींनी या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिले.
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानाची पद्धत सरकारने काढण्याचा प्रयत्न केला आहे यावरून सरकार किती घाबरले, हे दिसून येत आहे. महाविकास आघाडीची आपल्या पक्षांतर्गत असणारी नाराजी, बंडखोरी समोर येईल ही भीती त्यांना निश्चितच होती असेही दरेकर यांनी सांगितले.

