शिंदे गट पळपुटा ,त्यांच्या तोंडाला कुलूप ,अन चावी दिल्लीत
मुंबई-“ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. एकेकाळी ज्योतिराव फुलेंचं उत्पन्न हे टाटांपेक्षा जास्त होतं. त्यांनी आपली सगळी संपत्ती शाळा-कॉलेज, दलितांसाठी वापरली. त्या काळात टाटांचं उत्पन्न २० हजार होतं, तेव्हा ज्योतिबा फुलेंचं उत्पन्न २१ हजार होतं. याची इतिहासात नोंद आहे, हे यांना माहिती नाही. त्यांना हे शब्द मागे घ्यावे लागतील आणि महाराष्ट्राची माफी मागावी लागेल”, असा स्पष्ट इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे .शाळा उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावर टीका करताना ते पुढे म्हणाले,’भाजपमध्ये अकलेचे कांदे भरले आहेत. या महापुरुषांनी लोकवर्गणीतून दलितांसाठी शाळा उभारून मोठे समाजकार्य केले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई काहीही बरळले तरी फरक पडत नाही. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लढाईत का उतरत नाहीत?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही या बसवराज बोम्मईंच्या वक्तव्याचा आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी समाचार घेतला. तसेच, यावरून शिंदे गटावरही टीका केली. संजय राऊत म्हणाले, कर्नाटकच्या अत्याचाराविरोधात ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, शिंदे सरकारच्या तोंडाला कुलूप लागले आहे. आणि त्याची चावी दिल्लीत आहे.संजय राऊत म्हणाले, बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्राविरोधात बरळत आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात शिंदे-फडणवीस सरकार लढाईत उतरणार की नाही? या लढाईत सरकार कुठेच दिसत नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाच्या आमदार, खासदारांनी अद्याप तोंड उघडलेले नाही. कालदेखील मविआचेच खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले व सीमावादावर आपली भूमिका मांडली. लोकसभेतही मविआचेच खासदार कर्नाटकच्या अत्याचाराविरोधात बोलले.संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाचे खासदार पळपूटे आहेत. त्यामुळेच कर्नाटकात भाजप सरकार सत्तेत असल्याने ते तोंड उघडत नाही. त्यांच्या तोंडाला कुलूप आहे आणि त्याची चावी दिल्लीत आहे. खरे तर शिंदे गटाला ढाल-तलवार ही चुकीची निशाणी भेटली आहे. चावी-कुलूप हीच त्यांची निशाणी हवी, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

