पुणे, 10 जानेवारी 2022: – मध्यप्रदेश बिलियर्ड्स अँड स्नूकर संघटनेच्या वतीने आयोजित व बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली आयोजित 88व्या बिलियर्डस अँड स्नूकर राष्ट्रीय आणि 10व्या सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत महाराष्ट्राच्या ईशप्रीत चड्डा, रयान राझमी, सुमेर मागो या खेळाडूंनी विजेतेपद संपादन केले. हि स्पर्धा एसएजीइ युनिव्हर्सिटी, भोपाळ येथे पार पडली.
या स्पर्धेत देशभरातून 14 गटातील स्पर्धांमध्ये 11 ते 72 वयोगटातील 970 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्राच्या रयान राझमी याने कुमार स्नूकर आणि बिलियर्ड्स स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तर, सब-ज्युनियर बिलियर्ड्स स्पर्धेत सुमेर मागो याने विजेतेपद पटकावले. पुरुष स्नूकर स्पर्धेत ईशप्रीत चड्डाने लक्षवेधी कामगिरी करत विजेतेपदाचा मान पटकावला.
88व्या वरिष्ठ बिलियर्ड्स स्पर्धेत वरिष्ठ गटात अनेकवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकवणाऱ्या व जागतिक विजेता पीएसपीबीच्या पंकज अडवाणी याने विजेतेपद पटकावत आणखी एक राष्ट्रीय विजेतेपदाचा मान पटकावला. तर, कर्नाटकाच्या पीएसपीबीच्या एस श्रीकृष्णाने सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत विजेतेपद मिळवले. महिला गटात कर्नाटकाच्या महिला राष्ट्रीय विजेती विद्या पिल्लई हिने विजेतेपद पटकावले. बिलियर्ड्स प्रकारात वर्षा संजीवने तर स्नूकर प्रकारात मध्यप्रदेशच्या अमी कमानीने विजेतेपद मिळवले.
यावेळी बीएसएफआयचे अध्यक्ष राजन खिंवसरा म्हणाले की, कोविड महामारीमुळे आमच्यासाठी हे वर्ष खूप आव्हानात्मक होते. पण असे असतानादेखील या काळात 36 दिवसीय ही अजिंक्यपद स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून आम्ही 2021 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या स्पर्धेमुळे देशातील क्यू स्पोर्ट्स खेळाला नक्कीच हातभार लागेल अशी खात्री आहे. तसेच, पुढील वर्षी अधिकाधिक आंतराष्ट्रीय स्पर्धा आणि सांघिक स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.
अन्य राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे: कुमार बिलियर्ड्स स्पर्धा(मुली): अनुपमा आर.(तामिळनाडू), कुमार स्नूकर स्पर्धा(मुली): अनुपमा आर.(तामिळनाडू), सब-ज्युनियर स्नूकर(मुले): रणवीर दुग्गल(चंदीगढ), सब-ज्युनियर बिलियर्ड्स स्पर्धा(मुली): स्नेथारा बाबू(तामिळनाडू), सब-ज्युनियर स्नूकर स्पर्धा(मुली): कनिशा जूरानी(मध्यप्रदेश).