मुंबई: दिव्यज फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने ऍसिड हल्लावर मात करणाऱ्या विजेत्यांना आत्मविश्वास देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन वरळी, मुंबईत करण्यात आले. या कार्यक्रमाला
बॉलिवूडबरोबरच समाजातल्या दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस होते.
या कार्यक्रमात बोलताना, ‘ऍसिड हल्लेखोरांविरोधात कठोर कायदे करण्याची ग्वाही देत ऍसिड हल्ला पिडीतांना मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या रखमेत वाढ केल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले. या पिडीतांना दिली जाणारी तीन लाखांची मदत वाढवून पाच लाख करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
आपल्यावर झालेल्या अन्यायाला लढा देत पुन्हा एकदा समाजाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या या विजेत्यांना दिव्यज् फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मदतीचा हात देऊ केला. याविषयी बोलताना महाराष्ट्र राज्य
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी, “या पिडीतांना सहानुभूतीची नव्हे तर समानुभूतीची गरज असून… समाजाने ती देऊ करावी, असे आवाहन केले.
दरम्यान यावेळी उपस्थित महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही ऍसिड हल्ल्यावर विजय मिळवणाऱ्यांच्या जगण्याच्या उमेदीचे कौतुक केले.
या कार्यक्रमाची सूत्र अमृता फडणवीस यांनी सांभाळली असून बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला, सोनाली बेंद्रे आणि विवेक ओबेरॉयबरोबरच महापालिका आयुक्त अजय मेहता, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि इतरही काही मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांबरोबरच अमृता यांच्या आवाजातील ‘जीत जाऊं ए खुदा, अगर तू मेरे संग है’ या गाण्यावर या विजेत्यांचा ‘कॉन्फीडंस वॉक’ झाला. यातील सर्वात लहान मुलीबरोबर अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी दिविजा फडणवीस यांनी रॅम्पवॉक झाला.
दरम्यान या कार्यक्रमातून गोळा होणारा निधी या विजेत्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार असून दिव्यज फाऊंडेशन आणि महिला आयोगाच्यावतीने या विजेत्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.














