मुंबई, दि. २५ :- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घ्यायची राज्य सरकारची तयारी आहे मात्र या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल असून या याचिकेसोबत अन्य १२ याचिकांची एकत्रित सुनावणी सुरु आहे. त्यामुळे स्थगिती आणि न्यायप्रविष्ट बाब असल्याने बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया घेता येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य प्रकाश आबिटकर यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की. ७ मे २०११ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. कृषि विभागाचे तत्कालिन प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल आणि नियोजन विभागाचे तत्कालिन प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांना प्रशासक म्हणून नेमले. बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली झाल्याने नंतरच्या काळात व्ही.के. अग्रवाल, साहनी यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले, नंतरच्या काळात नाबार्डमधून निवृत्त झालेले सुखदेवे, अशोक मखदूम यांना प्रशासकपदी नेमले. प्रशासक म्हणून कुणाला नेमायचे हा सहकारमंत्री, मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, त्यानुसारच २०१८ पासून बॅंकेचे प्रशासक म्हणून विद्याधर अनास्कर हे काम पाहत आहेत, त्यांना नियमित प्रशासकपदी ठेवण्याचा निर्णय नियमाप्रमाणे झाला असून बॅंकेच्या लेखापरीक्षण, भागभांडवल, नफा आदी सर्व गोष्टी चांगल्या आहेत, त्यामुळे श्री. अनास्कर यांना सरकारने प्रशासकपदी ठेवले आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बॅंकेच्या प्रशासकामार्फत २०१९-२० मध्ये १२ हजार १६ कोटी रकमेची कृषि कर्जे आणि १३ हजार ४६९ कोटी रुपयांची बिगरशेती कर्जे याप्रमाणे एकूण २५ हजार ४८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सन २०२०-२१ मध्ये सुमारे २१ हजार २१९ कोटी रुपयांचे कर्जे वाटप करण्यात आली आहेत. बॅंकेची आर्थिक स्थिती सक्षम असून २०२०-२१ मध्ये बॅंकेस ३६४.४१ कोटी रकमेचा नफा झाला आहे तर ३१ मार्चपर्यंत बॅंकेचा ढोबळ नफा ७०० कोटी तर निव्वळ नफा ४०० कोटी रुपयांपर्यंत होऊ शकतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेवर शासनासह नाबार्ड, रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण असून बॅंकेकडून साखर कारखाने अथवा इतर संस्थांना कागदपत्रांची पुर्तता होत असेल तर कर्जपुरवठा केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

