१५ ऑगस्टपासून राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा

Date:

मुंबई, दि. १२ : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापासून महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील सहा विभागांमध्ये स्टार्टअप, उद्योजकता, नाविन्यता, युनिकॉर्न याविषयी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार असून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत, अशी माहिती विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली.

मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर नागपूर येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे येथूनही त्या त्या विभागातील यात्रेचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ होणार आहे. तळागाळातील व ग्रामीण दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे तसेच राज्याची उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा या स्टार्टअप यात्रेचा उद्देश आहे, असे श्रीमती वर्मा यांनी सांगितले.

या यात्रेतील मोबाईल व्हॅन ही राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय, लोकसमूह एकत्रित होणाऱ्या जागा या ठिकाणी जाऊन उद्योजकता आणि स्टार्टअपविषयी जनजागृती करेल. नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन त्यांना माहिती देण्यात येईल. यात्रेमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्रांचेही (Bootcamp) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक उद्योजकांची व्याख्याने होतील. त्याचबरोबर नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या नागरीकांना त्यांच्या संकल्पनांचे शासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

१० हजारापासून १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके

कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीसमोर अंतिम सादरीकरण होईल. राज्यस्तरावर एकूण २६ विजेत्यांची निवड केली जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यांमध्ये उत्तम ३ विजेत्यांची निवड केली जाईल. २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी पारितोषिके देण्यात येतील. विभागस्तरावर ६ सर्वोत्कृष्ट नवउद्योजक व ६ सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. राज्यस्तरावर १४ विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. यामध्ये प्रथम पारितोषिक १ लाख रुपये तर द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये आहे. याशिवाय विजेत्या संकल्पनांना प्री-इन्क्युबेशन तसेच इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल, निधी सहाय्य, स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ज्ञ व संस्थांद्वारे मार्गदर्शन, सॉफ्टवेअर, क्लाऊड क्रेडीट्स यांसह इतर आवश्यक पाठबळ देण्यात येणार आहे.

प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पक युवावर्ग आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ते नवनवीन संकल्पना विकसित करीत आहेत. राज्याच्या तळागाळातून अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व नवउद्योजकांचा शोध घेऊन त्यांच्या संकल्पनांना बळ देण्यासाठी स्टार्टअप यात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पनांचा राज्याच्या विकास प्रक्रियेत लाभ घेता येणार आहे. राज्याच्या स्टार्टअप परिसंस्थेला अधिक चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्टार्टअप रँकिंगमध्ये महाराष्ट्र टॉप परफॉर्मर

स्टार्टअप रँकींग २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर श्रेणीमध्ये आले आहे. देशातील १०४ युनिकॉर्नपैकी २४ युनिकॉर्न्स म्हणजे २३ टक्के युनिकॉर्न्स महाराष्ट्रातील आहेत. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन १ बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे ७ हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. देशातील एकूण २ लाख १३ हजार स्टार्टअप्सपैकी ३६ हजार ८०० म्हणजे १८ टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ ते ३० स्टार्टअप्स असून अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यात ३२ तर नंदुरबार जिल्ह्यात ३७ स्टार्टअप्स आहेत. मुंबई महानगरात १४ हजार ७०० तर पुण्यामध्ये ८ हजार ६०० स्टार्टअप्स आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...