पुणे-माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे निवडणुक अधिकारी पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस कमिटींचा डिजीटल सभासद नोंदणी बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते पल्लम राजू यांचा श्री गणेश मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना पल्लम राजू म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण देशात काँग्रेस पक्षातर्फे सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. डिजीटल मेंबरशिपद्वारे आपण जनतेमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सांगून त्यांना पक्षाचे क्रियाशिल सभासद करणार आहोत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नेहमी केंद्रिय नेतृत्वाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहकार्य केले आहे. या डिजीटल सभासद नोंदणी व संघटनात्मक निवडणुकीसाठी माझी नेमणुक प्रदेश निवडणुक अधिकारी म्हणून केली आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी केली पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात मुख्य नोंदणीकृत व बुथमध्ये नोंदणीकृतची नेमणूक करावी. पक्षातील सर्व प्रमुख नेते मंडळी, पदाधिकरी, नगरसेवक यांनी हे डिजिटल सभासद नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी हे पक्ष बळकट करण्यासाठी भरपूर मेहनत करीत आहे. केंद्रातील भाजप सरकार आपल्या बहुमताच्या आधारावर देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. या जातीयवादी शक्तींना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करून २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्तेत आणण्याचा निर्धार करावा. मला खात्री आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या सभासद नोंदणीमध्ये पहिला क्रमांक मिळविणार.’’
यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सोनल पटेल यांनी डिजीटल सभासद नोंदणीच्या कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातले पाहिजे अशी सूचना केली. जे नेतेमंडळी या सभासद नोंदणीमध्ये भाग घेवून जास्तीत जास्त सभासद करतील त्यांना पक्ष संघटनेच्या विविध पदांवर नेमणुक केली जाईल. पक्ष संघटना मजबूत झाली तरच आपण सत्तेवर येवू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याची गरज आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘गेली १५ दिवस आपण या डिजीटल सभासद नोंदणीसाठी शहर पातळीवर व ब्लॉक पातळीवर प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविला. पुणे शहरामध्ये ६५ मुख्य नोंदणीकृतांची नेमणुक केली आहे आणि बुथ पातळीवर १ महिला व १ पुरूष यांची नेमणुक करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या डिजीटल सभासद नोंदणी अभियानामध्ये सहभागी होऊन पुण्यात जास्तीत जास्त सभासद केले पाहिजे.’’
यानंतर माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे डिजीटल सभासद नोंदणी अभियान अत्यंत शिस्तबध्द पद्धतीने राबविण्यात येत आहे. पक्षाचे पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, फ्रटंलचे प्रमुख व विविध सेलचे प्रमुख यांनी पुढच्या दिड महिन्यात ही सभासद नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.’’
प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यात डिजीटल सभासद नोंदणीच्या संदर्भामध्ये माहिती दिली. या आढावा बैठकीत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व मुख्य नोंदणीकर्ता उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे डिजीटल सभासद नोंदणीचे महाराष्ट्राचे समन्वयक राहुल साळवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे, विशाल पाटील, आ. संग्राम थोपटे, आ. संजय जगताप, पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष कैलास कदम, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, राजन भोसले, चिटणीस राजेंद्र शेलार, नगरसेवक अविनाश बागवे, राजेंद्र शिरसाट व इतर पदधिकारी उपस्थित होते.

